तुम्ही चिंता सोडा; बार्शी नाका रेल्वे थांबा मी मंजूर करून घेतो
खा.बजरंग सोनवणे यांचा रेल्वे कृती समितीला बैठकीत शब्द, समितीकडून टाळ्या वाजवून स्वागत

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
बीड जिल्हा प्रतिनिधी
बीड: अवघ्या काहीच दिवसात बीडला रेल्वे येत आहे. बीडपर्यंतचा रेल्वे भुसंपादनाचा विषय मार्गी लावला असून १२ मार्च २०२५ च्या संसदीय अधिवेशनासाठी बीडच्या रेल्वेने जाण्याचा माझा प्रयत्न आहे. त्यासाठी आवश्यक पाठपुरावा सुरू आहे. दरम्यान, बीडमधील बार्शी नाका इमामपुर रोड परिसरात रेल्वेला थांबा देण्याची मागणी समोर आली आहे. खासदार या नात्याने रेल्वे थांबा देण्याची जबाबदारी माझी असून तुम्ही चिंता सोडा, बार्शी नाका येथे रेल्वे थांबा मंजूर करून घेतो, असा शब्द खा.बजरंग सोनवणे यांनी रेल्वे कृती समितीला दिला. यावेळी समितीने त्यांचे टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले.
येथील शासकिय विश्रामगृह येथे सायंकाळी ५ वाजता खा.बजरंग सोनवणे यांच्या उपस्थितीत रेल्वे कृती समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीला कृती समितीचे अध्यक्ष गंमत भंडारी, माजी आ.सय्यद सलिम, मा.आ.उषा दराडे, जेष्ठ नेत्या सुशीला मोराळे, शिवसेना जिल्हाप्रमूख स्वप्नील गलधर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, भागवत तावरे, खुर्शीद आलम, सुनील सुरवसे, बी.बी.जाधव यांची उपस्थिती होती. यावेळी समितीचे अध्यक्ष गंमत भंडारी यांनी रेल्वे थांबा कसा गरजेचा आहे, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी माजी आ.सय्यद सलिम, मा.आ.उषा दराडे, जेष्ठ नेत्या सुशीला मोराळे यांनीही आपली मते मांडली. यानंतर बोलताना खा.बजरंग सोनवणे म्हणाले, रेल्वे हा बीडच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. मागील अनेक वर्षांपासून अनेकांनी यासाठी लढा दिला आहे. जेल भोगले आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी मला खासदार म्हणून संधी दिल्यानंतर दोनच दिवसात पहिली बैठक रेल्वेची लावली. याच बैठकीत रेल्वेचा आढावा घेत रेल्वे अधिकाऱ्यांकडून रेल्वे आणण्यासाठी कालावधी ठरवून दिला. पहिला टप्पा अंमळनेर ते विघनवाडी, विघनवाडी ते नवगण राजुरी असे दोन टप्पे पुर्ण केले. आता रेल्वे बीडला येत आहे. २६ जानेवारीपर्यंत रेल्वे बीडला आली असती मात्र, एकदोन भुसंपादनाच्या विषयात अधिकाऱ्यांनी दिरंगाई केल्याने रेल्वे आज येऊ शकली नाही. मात्र, भुसंपादनाचे विषय मार्गी लावले असून आता अवघ्या काही दिवसात रेल्वे बीडला येईल. शिवाय याच महिनाभरात बीड ते अहिल्यानंतर रेल्वे सुरू करण्याचा प्रयत्न आहे. याच बरोबर मार्चअखेर ही रेल्वे वडवणीपर्यंत धावेल. तर जून-जुलैमध्ये सिरसाळापर्यंत रेल्वे धावले आणि मार्च २०२६ पर्यंत रेल्वे परळीपर्यंत पोहचेल, असे काम करून घेण्यासाठी आपण पाठपुरावा करत आहोत. दरम्यान, बीडमध्ये पालवन भागात रेल्वे स्टेशन तयार झाले असून बार्शी नाका इमामपुर भागात रेल्वे थांबा देण्याची मागणी देखील पुढे आलेली आहे. यासाठी रेल्वे कृती समितीला सोबत घेवून आपण हे रेल्वे स्टेशन मंजूर करून घेवू, त्यासाठी आंदोलन वगैरे करायची गरज नाही. हा विषय माझी जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी आपण पुर्ण करून रेल्वे स्टेशन मंजूर करून घेऊ, असा शब्द यावेळी दिला.
००
तीन कामांचा केला उल्लेख
बीड रेल्वे कृती समितीसोबत चर्चा करताना खा.बजरंग सोनवणे यांनी तीन कामांचा उल्लेख केला. यात रेल्वेचे काम वेळेत करून घेणे, धारूरच्या घाटाचे कटींग- पालखी मार्गातील घाटाचे काम करून घेणे, बीडला दुसरा बायपास मंजूर करून घेणे, ही तीन कामे करून घेणे, हे या वर्षातील ध्येय असल्याचा उल्लेख त्यांनी केला.
००
धाराशीव- जालना रेल्वेसाठी करणार प्रयत्न
अहिल्यानंतर परळी रेल्वेमार्गाचे काम आता मार्गी लागत असून येणाऱ्या काळात धाराशीव-जालना या रेल्वेमार्गासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. हा मार्ग केवळ १८० किलोमिटरचा असून हा जोडला तर सर्वात मोठे काम बीडसाठी होणार आहे. हे करण्यासाठी आपण रेल्वेमंत्र्यांना लवकरच भेटत असून याची या पाच वर्षात सुरूवात जरी झाली तरी समाधान असेल, असेही खा.बजरंग सोनवणे म्हणाले.
०००
गंमत भंडारी, मा.आ.दराडेंकडून कौतूक
खा.बजरंग सोनवणे यांनी खासदार झाल्यापासून बीडचे अनेक विषय मांडले. इतके विषय मांडण्याची संधी त्यांना त्यांचा पक्ष देत असून ही बीडसाठी अभिमानाची गोष्ट आहे, अशा शब्दात समितीचे अध्यक्ष गंमत भंडारी यांनी कौतूक केले तर मा.आ.उषा दराडे यांनी खा.बजरंग सोनवणे यांची बीडच्या विकासाबाबत तळमळ दिसत असून ते ज्या पध्दतीने संसदेत विषय मांडत आहेत, त्याबाबत त्यांचे करावे तितके कौतूक कमी आहे, असे त्यांनी म्हटले.
००
कृती समितीसोबत केली पाहणी
बार्शी नाका परिसरातील इमामपुर येथील रेल्वे थांबा हा नियोजीत होता. त्याठिकाणी सायंकाळी साडेसहा वाजता खा.बजरंग सोनवणे यांनी कृती समितीसोबत जावून जागेची आणि तेथील कामांची पाहणी केली. याठिकाणी त्यांनी परिसरातून आलेल्या नागरिकांशी संवादही साधला.
००
कृती समितीने काय म्हटलेय निवेदनात
अनेक वर्षे पर्वीच सदरील स्टेशन बार्शी नाका येथे मंजूर आहे.
बार्शी नाका स्टेशनला ६० टक्के गायरान जागा उपलब्ध आहे. तसंच ज्यांच्या मालकीची जमीन जाणार आहे. त्यांना पूर्ण मावेजा दिले गेले आहे. त्यामुळे विना खर्च स्टेशन तयार मिळणार आहे.
या पुर्वीच ४.२२ कोटी खर्च करुन येथे स्टेशन बांधलेले आहे.
सदरील स्टेशनला रेल्वे ट्रॅक बनून तयार आहे.
सदरील स्टेशनलगत हायवे नं.२२२ व २११. तसेच बायपास व बीड ते नेकनूर १०० फुट रस्ते तयार असल्यामुळे ट्रॉफीक होणार नाही.
नविन व जुना माँढा जवळ आहे.
जिल्हा रुग्णालय जवळ आहे.
बस स्टॅन्ड जवळ आहे.
९० टक्के शाळा, महाविद्यालय जवळ आहे.
शहरातील व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यासाठी सोईचे स्टेशन आहे.
शहरातील गरीब कष्ट करणाऱ्या कामगारासाठी सोईचे स्टेशन आहे.
सोलापूर-जळगाव रेल्वेमार्ग झाल्यास जंक्शनसाठी योग्य राहील.
बार्शी नाका स्टेशनला चार आणे खर्च केले की स्टेशन तयार.
पालवण येथे नवीन स्टेशन जागी हजारो प्लॉटधारकांना संपादीत करुन मावेजा वाटप करावा लागेल. येथील जमिनीचे भाव जास्त असून येथे काही बांधकामेही झालेली आहेत. यामुळे रेल्वेचा खर्च वाढेल व रेल्वेसाठी विलंब होऊ शकतो.
सातही तालुक्यासाठी अत्यंत सोयीसकर ठरेल.