चांभार गड प्रादेशिक पर्यटन व तीर्थक्षेत्र ‘क’ गटात समाविष्ट करा ; आमदार अबू आसिम आजमी यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
प्रदेश सचिव ऍड.शिवाजी कांबळे यांची माहिती

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
मौजे चांभारखिंड, ता.महाड (जि.रायगड) येथील ‘चांभार गड’ हा किल्ला प्रादेशिक पर्यटन व तीर्थक्षेत्र ‘क’ गटात समाविष्ट करावा अशी मागणी समाजवादी पार्टी मुंबई / महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आसिम आजमी यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे शिफारस पत्राद्वारे केली आहे. अशी माहिती समाजवादी पार्टीचे प्रदेश सचिव ऍड.शिवाजी कांबळे यांनी दिली आहे.
समाजवादी पार्टीचे प्रदेश सचिव ऍड.शिवाजी कांबळे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की, मी सध्या मुंबई येथे आलो होतो. राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची आमदार अबू आसिम आजमी साहेबांनी भेट घेऊन चांभारगडाची प्रादेशिक पर्यटन व तीर्थक्षेत्र ‘क’ गटात समाविष्ट करण्याबाबत शिफारस केली आहे. तसे लेखी पत्र शनिवार, दिनांक १ फेब्रुवारी २०२५ रोजी दिले आहे. सदरील शिफारस पत्रात नमूद केले आहे की, आपल्या रायगड जिल्ह्याला सातव्या शतकापासुनचा वैभवसंपन्न इतिहास आहे. शिव काळात देखील पश्चिम किनारपट्टी व ऐतिहासिक व्यापारी मार्गांचे रक्षण करण्यासाठी दौलत गड, सोनगड, महेंद्रगड उर्फ चांभार गड या किल्ल्यांची साखळी या भागात निर्माण केली गेली. महेंद्रगड उर्फ चांभार गड हा किल्ला चर्मकार समाजाचे तीर्थक्षेत्र असून संपूर्ण राज्यभरातून येथे मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. त्यामुळे या शिवकालीन चांभार गड किल्ल्यास प्रादेशिक पर्यटन व तीर्थक्षेत्र ‘क’ गटात समाविष्ट करण्यात यावे, अशी चर्मकार समाज बांधवांची मागणी आहे. तरी आपण जातीने लक्ष घालून मौजे चांभार खिंड, ता.महाड (जि.रायगड) येथील चांभार गड हा किल्ला प्रादेशिक पर्यटन व तीर्थक्षेत्र ‘क’ गटात समाविष्ट करण्याबाबत नियमानुसार योग्य ती कार्यवाही करावी. अशी विनंती आमदार अबू असीम आजमी यांनी केली आहे. शिफारस पत्राच्या प्रती माहितीस्तव १) जिल्हाधिकारी रायगड व २) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रायगड यांना पाठविण्यात आल्या आहेत. अशी माहिती समाजवादी पार्टीचे प्रदेश सचिव ऍड.शिवाजी कांबळे यांनी दिली आहे.
*शिफारशीबद्दल चर्मकार समाजाकडून जाहीर आभार :*
शिवरायांच्या काळात चांभार गडावर चालून आलेल्या शत्रूंना पहिल्यांदा सामोरे जावे लागायचे ते चर्मकार योद्ध्यांशीच. चर्मकार योद्ध्यांच्या पराक्रमाची साक्ष म्हणूनच या परिसराला ‘चांभार खिंड’ असे नांव पडले. रायगड मधल्या महाड येथील चांभार खिंड तसेच चांभार गड येथे हजारो चर्मकार बांधव दरवर्षी एकत्र येतात. चांभार गड सामाजिक लढाईला प्रेरणा देतो. दलित जातींना देशातील जातीय विषमतेमुळे कायमच अपमान सहन करावा लागत असला तरी प्रत्यक्षात देशातील अनेक दलित जातींचा इतिहास हा युद्ध तसंच लढायांमधील शौर्याच्या कामगिरींनी सजलेला आहे. भिमा – कोरेगाव येथील विजयस्तंभाला ज्याप्रमाणे बौद्ध समाज बांधव हे आपल्या पराक्रमाचे प्रतीक मानतात, त्याप्रमाणे रायगड मधल्या महाड येथील चांभार खिंड तसेच चांभार गड म्हणजे चर्मकार समाजाच्या शौर्याचे व अस्मितेचे प्रतीक आहे. मौजे चांभार खिंड, ता.महाड (जि.रायगड) येथील “चांभार गड” हा किल्ला प्रादेशिक पर्यटन व तीर्थक्षेत्र ‘क’ गटात समाविष्ट करावा अशी मागणी शिफारस पत्राद्वारे समाजवादी पार्टी मुंबई / महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आसिम आजमी यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे केली आहे. त्याबद्दल चर्मकार समाजाकडून आमदार अबू आसिम आजमी साहेब यांचे जाहीर आभार..!
*- ऍड.शिवाजी कांबळे*
(प्रदेश सचिव – समाजवादी पार्टी, महाराष्ट्र राज्य.)