राज्य परिवहन महामंडळाची प्रस्तावीत भाडेवाढ रद्द करा
बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
राज्य परिवहन महामंडळाची प्रस्तावीत भाडेवाढ रद्द करा अशी मागणी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपजिल्हाधिकारी, अंबाजोगाई यांच्या मार्फत दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना २८ जानेवारी रोजी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, महाराष्ट्र शासनामार्फत सर्वसामान्य जनतेसाठी चालविण्यात येणाऱ्या राज्य परिवहन महामंडळास प्रवासी भाड्यामध्ये १४.९ टक्के जाहिर केलेली आहे. वास्तविक आज रोजी महाराष्ट्र शासनामार्फत चालविण्यात येणारे दोनच घटक सर्वसामान्य नागरीकांच्या हिताच्या आहेत. त्यामध्ये जिल्हा परिषद शाळा आणि राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस. त्यापैकी जिल्हा परिषद शाळा या उद्योगपतींना चालविण्यासाठी देण्याचे जाहिर झालेले आहे. तथापी विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य परिवहन महामंडळ हे नफ्यामध्ये चालत असल्याची घोषणा राज्य शासनामार्फत करण्यात आली होती. आज रोजी राज्य परिवहन महामंडळामध्ये जवळपास ८७ हजार कर्मचारी हे तुटपुंज्या वेतनावर नौकरी करीत आहेत. त्यामुळे शासनाच्या इतर अस्थापनांच्या तुलनेत राज्य परिवहन महामंडळाचा महसूल कर्मचारी वेतनावर अत्यंत कमी खर्च होतो. तरी देखील निवडणुका संपल्यानंतर केवळ ३-४ महिन्यात महामंडळ तोट्यात येते. ही बाब अगम्य आहे. माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे मुख्यमंत्री असताना १३०० बसेस भाडेतत्वावर घेण्यात आल्या होत्या, त्या कोणाच्या मालकीच्या आहेत. हे मात्र गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. त्यामुळे हे सरकार कोणावर एवढे मेहेरबान झाले होते. हे सर्वसामान्य जनतेस उघड होणे आवश्यक आहे. तथापी टोल टॅक्स मधून जरी राज्य परिवहन महामंडळाची प्रवासी वाहने टोलमुक्त केल्यास देखील राज्य परिवहन महामंडळावरील आर्थिक ताण बऱ्याच अंशी कमी होणे शक्य आहे. परंतू, तसे न करता सर्वसामान्य जनता महागाईमुळे भरडली जात असताना देखील प्रवासभाड्यामध्ये १४.९ टक्के अशी भरघोस वाढ, भाडेवाढ करून सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. सदरची भाडेवाढ ही महाराष्ट्रातील जवळपास ७० टक्के जनतेवर अन्यायकारक असून ती तात्काळ रद्द करण्यात येणे आवश्यक आहे. तसे न झाल्यास नाईलाजाने बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव ऍड.माणिक बन्सी आदमाने यांनी दिला आहे. सदरील निवेदनावर ऍड.वसंत हजारे, भारत होके, राजेभाऊ आदमाने आणि प्रशांत होके यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.