आदित्य ग्रीन कंपनीला पर्यायी जागा द्यावी
युवा आंदोलनचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
बहुजनांच्या न्याय हक्कांसाठी लढणारी युवा आंदोलन ही संघटना मौजे जवळगाव (ता.अंबाजोगाई) येथील भूमिहीन मागासवर्गीय समाज बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी सरसावली आहे. आदित्य ग्रीन कंपनीला मौजे जवळगाव (ता.अंबाजोगाई) शिवारातील दिलेली गट नं-211 मधील सस्कारी गायरानातील जमिनीचा करार रद्द करून पर्यायी जागा देण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकारी, बीड यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
युवा आंदोलन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अशोक पालके यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी, बीड यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, आदित्य ग्रीन कंपनीला मौजे जवळगाव (ता.अंबाजोगाई) शिवारातील दिलेली गट नं-211 मधील सरकारी गायरानातील जमिनीचा करार रद्द करून पर्यायी जागा देण्यात यावी. कारण, दिलेल्या जमीनीवर भूमीहिन मागासवर्गीयांचे अतिक्रमण आहे. ते मौजे जवळगाव शिवारातील गट नंबर – 211 मधील सरकारी गायरान जमीन 43 वर्षांपासून पिकवून आमचा उदरनिर्वाह भागवतो सदरील जमीनीवरील अतिक्रमण निलंबित करावे म्हणून आम्ही तहसिलदार, अंबाजोगाई यांना वेळोवेळी अर्ज दिला आहे. आमच्या या जमिनीतील पिकांचे पीक पंचनामे तहसिलदार, अंबाजोगाई यांच्या मार्फत झालेले आहेत व त्या पीक पंचनाम्याचे रेकॉर्ड उपलब्ध आहे. या मधील 02 वाहितीदारांचे गांव नमुना नंबर 01ई ला नोंद तहसील कार्यालयाने केलेली आहे. तेही रेकॉर्ड उपलब्ध आहेत म्हणजे वहिती अंमल आहे. सद्य परिस्थिति मध्ये आदित्य ग्रीन प्रा.कंपनी मार्फत सरकारी गायरानातील अतिक्रमणधारक यांच्या उभ्या पिकांचे नुकसान करून त्यांनी मुलाप्रमाणे जपलेली झाडे तोडली जात आहेत. हे सर्व आपल्या महसूल प्रशासन, पोलिस प्रशासन यांना हाताशी धरून धडपशाही केली जात आहे. शासनाची भूमिहीन मागासवर्गीयांसाठी दादासाहेब गायकवड यांच्या नांवाने सबलीकरण योजना राबविली जाते. पण, येथे जे भूमीहीन शासनाची पडीक जमीन पिकून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांचा ताब्यातील जमिनीवर विकासाच्या नांवाखाली पिकावर नांगर फिरवला जातो. हे पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारे नाही. तरी याप्रकरणी आपण लक्ष घालून प्रत्यक्ष सर्व पुरावे पाहून आम्हाला न्याय द्यावा सदरील कंपनीला पर्यायी जागा उपलब्ध करून यावी व ज्या महसूल प्रशासनातील अधिकारी कर्मचारी यांनी चुकीचा पंचनामा करून खरी माहिती लपविली त्या अधिकारी, कर्मचारी यांच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही करावी अशी विनंती करून जर शासन व प्रशासन यांनी वरील करार रद्द केला नाही तर युवा आंदोलन संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. त्यास शासन व प्रशासन जबाबदार असेल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. सदरील निवेदनावर युवा आंदोलन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अशोक पालके, बेटी बचावचे धीमंत राष्ट्रपाल, माजी सरपंच हनुमंत गायकवाड यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदन देताना मौजे जवळगाव (ता.अंबाजोगाई) येथील भूमिहीन मागासवर्गीय स्त्री, पुरूष समाज बांधव उपस्थित होते.