शेतकऱ्यांकडील पूर्ण सोयाबीन संपेपर्यंत शासनाने खरेदी केंद्र सुरू ठेवावेत – संभाजी ब्रिगेडची मागणी

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
अंबाजोगाई (वार्ताहर)
शेतकऱ्यांकडील पूर्ण सोयाबीन संपेपर्यंत शासनाने खरेदी केंद्र सुरू ठेवावेत अशी मागणी
संभाजी ब्रिगेडच्या वतीने बुधवारी उपजिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
याबाबत संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रविण उत्तमराव ठोंबरे यांच्यासह जिल्हा सचिव नारायणराव मुळे, संभाजी ब्रिगेड महिला आघाडीच्या अंबाजोगाई तालुकाध्यक्षा सुनंदाताई लोखंडे, विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष केशव टेहरे, तालुकाध्यक्ष पृथ्वीराज सोनवणे, मराठा सेवा संघाचे माजी जिल्हाध्यक्ष रामकिसन मस्के, जनता दल (सेक्युलर) पक्षाचे जिल्हाध्यक्ष वाजेद खतीब, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अंकुशराव ढोबळे, ऍड.व्हि.व्हि.उगले, डिगांबर सोळंके, ऍड.एस.पी.सोनवणे यांनी अंबाजोगाईचे उपजिल्हाधिकारी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि तहसीलदार यांना बुधवार, दिनांक ५ फेब्रुवारी रोजी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शेतकऱ्यांच्या घरी मागील दोन-तीन वर्षांपासून सोयाबीन पडून आहे. कारण तीन-चार वर्षांपासून सोयाबीनचा भाव वाढत नाही. म्हणून शेतकरी यांनी पोटाला चिमटा घेऊन सोयाबीन घरात ठेवली आहेत. म्हणून शासनाने खरेदी केंद्राची संख्या वाढवून शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी करावी. जे खरेदी केंद्र चालू आहेत, त्या खरेदी केंद्रांची कपॅसिटी वाढवून सोयाबीन खरेदी करावीत, जे खरेदी केंद्र चालू आहेत त्या केंद्रावर सोयाबीन चाळणाऱ्या मशीनची संख्या वाढवावी. २०२४ व २०२५ चा केंद्र शासनाचा हमीभाव रूपये ४८९२/- आहे. अंबाजोगाई बाजार समितीने हमीभावाचे परिपत्रक काढले आहे. माननीय उपजिल्हाधिकारी यांनी बाजार समितीला अंमलबजावणी करण्यास भाग पाडावे. जे व्यापारी सोयाबीन हमीभावाने खरेदी करणार नाहीत, त्या व्यापाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांचे लायसन्स रद्द करावे. तसेच उपजिल्हाधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या पुढील मागण्या मान्य कराव्यात. १) केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या घरातील सोयाबीन संपेपर्यंत खरेदी केंद्र चालू ठेवावे. २) अंबाजोगाई बाजार समितीने व उपजिल्हाधिकारी यांनी केंद्र सरकारच्या हमीभावाची अंमलबजावणी करावी. ३) २०२४ व २०२५ चा केंद्र सरकारचा सोयाबीनचा भाव ४८९२/- इतका आहे. त्याची अंबाजोगाई बाजार समितीने अंमलबजावणी करावी., ४) अंबाजोगाई शहरातील लातूर एडीएमचे सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करावे. हमीभावाने सोयाबीन खरेदी केली नाही तर संभाजी ब्रिगेड (ता.अंबाजोगाई) व अंबाजोगाई तालुक्यातील शेतकरी रस्ता रोको आंदोलन करणार आहेत. आंदोलनादरम्यान काही अनुचित प्रकार घडला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी शासन व प्रशासन यांची राहील. याची आपण नोंद घ्यावी असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
*सोयाबीन खरेदीची मुदत वाढवा :*
सोयाबीन खरेदी केंद्रांची मुदत संपली आहे. शासनाने ती वाढवावी, अन्यथा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शेतकरी मतदानातून महायुती सरकारला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. याची राज्य शासनाने नोंद घ्यावी. या प्रश्नी राज्य सरकारच्या विरोधात संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष ऍड.मनोजदादा आखरे व महासचिव सौरभदादा खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्ह्यात यापुढील काळात तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
*- प्रविण ठोंबरे*
(जिल्हाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड, बीड.)