अबुधाबीमधे उभारणार छ. शिवाजी महाराजांचा पुतळा: खा. सोनवणे
खा.बजरंग सोनवणेंच्या उपस्थितीत अबुधाबीत शिवजन्मोत्सव जल्लोषात

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
देश विदेश डिजिटल मिडिया न्यूज
अंतरराष्ट्रीय शिवजन्मोत्सव सोहळा- 2025
केज: महाराष्ट्रासह देशभरात शिवजयंती जशी उत्साहात साजरी झाली तसाच उत्साह आखाती देशातील अबुधाबीमध्ये मराठी माणसांनी दाखवून दिला. दि.२३ फेब्रुवारी रोजी बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या उपस्थितीमधे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खा.सोनवणे यांनी ‘ज्या पद्धतीने अबुधाबीमध्ये हिंदू मंदिराची स्थापना झाली, त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारावा, आणि त्याचा संपूर्ण खर्च येडेश्वरी फाउंडेशन मार्फत उचलण्यात येईल’, असा शब्द उपस्थित मराठी माणसांना दिला.
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जगभरातील विविध देशात साजरी केली जात आहे. महाराष्ट्र आणि हिंदूस्थानातील नागरिक परदेशात आता शिवजयंती साजरी करू लागले आहे. आखाती देशात स्थायिक झालेल्या नवीन मराठी पीढीला आपल्या महाराष्ट्राची दैदिप्यमान इतिहासाची ओळख करून देण्यासाठी आतापर्यंत अनेक सामाजिक कार्यक्रम पार पाडणाऱ्या इन्सायर इव्हेंटस युएई यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मागील सात वर्षांपासून उमेश नळगे पाटील, प्रदिप आघाव हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे आखाती देशांमधे आयोजन करतात. दरवर्षी वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांना या जयंती उत्सवाचे निमंत्रण दिले जाते. यावर्षी बीड जिल्ह्यातील जनतेने मोठ्या विश्वासाने निवडून दिलेले खा.बजरंग सोनवणे यांना प्रमुख म्हणून निमंत्रित केले आहे. त्यांच्यासोबत मालोजीराजे शाहू छत्रपती व मंत्री आयुष स्वतंत्र प्रभार आरोग्य व कुटूंब कल्याण राज्यमंत्री भारत सरकार-ना.प्रतापराव जाधव यांचीही उपस्थिती होती. यावेळी बोलताना खा.बजरंग सोनवणे म्हणाले, ज्या पद्धतीने अबुधाबीमध्ये हिंदू मंदिराची स्थापना झाली, त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारावा, आणि त्याचा संपूर्ण खर्च येडेश्वरी फाउंडेशन मार्फत उचलण्यात येईल, अरब देशातील बीएपीस हिंदू मंदिर, अबुधाबी येथे अखंड हिंदूस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवाचे आयोजन करणे ही अभियानाची गोष्ट आहे. या उत्सवाच्या निमित्ताने दुबईस्थित नागरिकांनी मला सन्मानपूर्वक आमंत्रित केले. या सोहळ्यात मालोजीराजे शाहू छत्रपती व राज्यमंत्री ना.प्रतापराव जाधव यांच्या सोबत सहभागी होण्याचा सन्मान लाभला ही आनंदाची गोष्ट असल्याचे ते म्हणाले.