संकल्प विद्या मंदिर शाळा गुणवत्तापूर्ण शिक्षणातून करतेय समाजबांधणी – डॉ.विठ्ठलराव लहाने
संकल्प विद्या प्रतिष्ठानच्या 'सुवर्णरत्न' पुरस्काराने शिवकुमार निर्मळे, वृक्षमित्र सुधाकर देशमुख, वर्षाताई मुंडे आणि विद्याधर पंडित सन्मानित

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
=======================
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
येथील संकल्प विद्या प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी दिल्या जाणा-या ‘सुवर्णरत्न’ पुरस्कारांचे वितरण यावर्षी शनिवार, दि.२२ फेब्रुवारी २०२५ रोजी करण्यात आले. यावर्षी हे पुरस्कार शिवकुमार निर्मळे (पत्रकारिता), वृक्षमित्र सुधाकर देशमुख (सामाजिक), वर्षाताई मुंडे (शिक्षण) आणि विद्याधर पंडित (कला) यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले.
शनिवारी आद्यकवी मुकूंदराज सांस्कृतिक सभागृहात पुरस्कार वितरणाचा अत्यंत दिमाखदार सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी बोलताना डॉ.विठ्ठलराव लहाने म्हणाले की, अंबाजोगाई शहर हे सकारात्मक ऊर्जेचा स्रोत आहे. माझे शिक्षण या शहरात झाले आहे. संकल्प विद्या मंदिर शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनासाठी सभागृहात उपस्थित पालकांची गर्दी पाहून लक्षात येते की, शिक्षण क्षेत्रात चोले दांम्पत्य हे अत्यंत तळमळीने कार्य करीत आहे. असे सांगून त्यांनी पालकांनो आपल्या घरात शैक्षणिक वातावरण निर्माण करा. विद्यार्थ्यांना कष्टाची, स्वयं अभ्यासाची सवय लावा, त्यांच्यात प्रामाणिकपणा पेरा, इमानदारी शिकवा. त्यांच्यातील जिद्द, चिकाटी, कष्ट, मेहनत या गुणांना प्रोत्साहन द्या. घरातील टि.व्ही.बंद करा, मुलांना मोबाईल पासून दूर ठेवा. त्यांच्यात शिक्षणाविषयी आवड निर्माण करा. आपल्या मुलांसाठी, कुटुंबासाठी वेळ द्या, कुटुंबात परस्परात संवाद, समन्वय ठेवा, स्नेहबंध वाढवा, आपसांत भांडणे करू नका. घराचे घरपण कायम ठेवा. दर्जेदार शिक्षण देणाऱ्या संकल्प विद्या मंदिर शाळेचा भविष्यात वटवृक्ष व्हावा अशा शुभेच्छा डॉ.लहाने यांनी दिल्या. उद्घाटक म्हणून बोलताना डॉ.नरेंद्र काळे म्हणाले की, अंबाजोगाई हे शिक्षणाचे माहेरघर आहे. जेवढा शिक्षक चांगला, तेवढी शाळा चांगली. चांगल्या शिक्षकांवरच शाळेचे यश अवलंबून असते. शाळेचा मालक हा संस्थाचालक व शिक्षक असल्यानेच त्यांच्या दूरदृष्टी व सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे संकल्प विद्या मंदिर शाळेने अल्पावधीत शिक्षण क्षेत्रात गुणवत्तापूर्ण शाळा अशी स्वतःची ओळख निर्माण केली आहे. आज शाळा चालविणे व विद्यार्थी मिळविणे ही अवघड बाब आहे. तशाही परिस्थितीत विविध उपक्रम राबवून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे काम संकल्प विद्या मंदिर शाळा करीत आहे. अंबाजोगाईच्या शैक्षणिक परंपरेला ते पुढे नेत आहेत असे डॉ.काळे म्हणाले. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण व मार्गदर्शक म्हणून सुप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉ.विठ्ठलराव लहाने (लातूर) हे होते. तर उद्घाटक म्हणून डॉ.नरेंद्र काळे (सचिव, बनेश्वर शिक्षण संस्था) हे होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजय गंभीरे (माजी नगरसेवक, न.प.अंबाजोगाई) तर प्रमुख अतिथी म्हणून शेख चाॅंद (गटशिक्षणाधिकारी, अंबाजोगाई), अधिष्ठाता तथा प्राचार्य डॉ.बाबासाहेब ठोंबरे (कृषी महाविद्यालय, लातूर), ऍड.राजेंद्रप्रसाद धायगुडे, संकल्प विद्या प्रतिष्ठानचे सचिव प्रा.कैलास चोले, मुख्याध्यापिका रेखाताई बडे हे मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी वृक्षमित्र सुधाकर देशमुख (समाजसेवा), शिवकुमार निर्मळे (पत्रकारिता), वर्षाताई मुंडे (शिक्षण) आणि प्रख्यात चित्रकार विद्याधर पंडित (कला) या मान्यवरांना त्यांनी त्यांच्या क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘सुवर्णरत्न पुरस्कार-२०२५’ देवून सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह, शाल, फेटा, श्रीफळ, पुष्पहार व पुष्पगुच्छ असे होते. सत्कारमूर्तींनी आपले मनोगत व्यक्त केले. तर अध्यक्षीय समारोप सामाजिक कार्यकर्ते संजय गंभीरे यांनी केला. तर प्रारंभी कार्यक्रमाची सुरूवात राष्ट्रगीताने करण्यात आली. दीपप्रज्ज्वलनानंतर नारळ वाढवून ग्रामदेवता माता श्री योगेश्वरी देवीचे प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वागतपर गीत सादर केले. त्यानंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यावेळी उपस्थितांना शाळेच्या प्रगतीचा चढता आलेख मांडणारा माहितीपट दाखविण्यात आला. प्रास्ताविक विद्यार्थीप्रिय मुख्याध्यापिका रेखाताई बडे यांनी केले. तर यावेळी स्कॉलरशिप करीता पात्र ठरलेल्या प्रगती सुधाकर केंद्रे, आरोही उत्तरेश्वर बनाळे, श्रावणी ओमप्रकाश कांगणे, सानिध्या ओंकार स्वामी, पृथ्वीराज तात्याराव निकम, प्रतीक कैलास जाधव या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले. त्यानंतर शाळेच्या विविध विभागप्रमुखांचा यथोचित सन्मान करण्यात आला. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते शेख मुख्तार यांच्याकडून संकल्प विद्या प्रतिष्ठानचे सचिव प्रा.कैलास चोले आणि मुख्याध्यापिका रेखाताई बडे यांचा सत्कार करण्यात आला. सोबतच संकल्प विद्या मंदिर शाळेच्या स्नेहसंमेलनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम ही आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी तब्बल ३१ विविध लोकप्रिय हिंदी आणि मराठी गीत प्रकारांतून आपला बहारदार कलाविष्कार सादर केला. आणि उपस्थित मान्यवर, पालक वर्गाची वाहवा मिळवली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती प्रिया नायक यांनी केले. तर उपस्थितांचे आभार सांस्कृतिक विभागप्रमुख श्रीमती प्रिया घाडगे यांनी मानले. या पुरस्कार वितरण सोहळा व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संकल्प विद्या प्रतिष्ठानचे सचिव प्रा.कैलास भागवत चोले, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती रेखा सुभाष बडे, सांस्कृतिक विभागप्रमुख श्रीमती अनिता कुलकर्णी, श्रीमती प्रिया घाडगे व संकल्प परिवाराच्या वतीने पुढाकार घेण्यात आला. यावेळी राजकीय, सामाजिक, शिक्षण, विधी, पत्रकारीता, उद्योग, क्रीडा, कृषी, सांस्कृतिक, साहित्य, कला आणि संगीत क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. तर आद्यकवी मुकूंदराज सांस्कृतिक सभागृह पालकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने तुडुंब भरले होते. वंदे मातरम् ने कार्यक्रमाची सांगता झाली.