कवयित्री कै.शैलजा चौधरी यांच्या ‘शैलाच्या कविता’ काव्यसंग्रहाचा मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन सोहळा
_कवयित्री कै.शैलजा यांची कविता अंतर्मनाला चालना देणारी व प्रेरणादायी आहे - माजी आमदार श्रीकांत जोशी_

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
=======================
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
अंबाजोगाईतील खोलेश्वर महाविद्यालयाचे सेवानिवृत्त उपप्राचार्य प्रा.अजय मधुकरराव चौधरी यांच्या पत्नी तथा कवयित्री कै.शैलजा अजय चौधरी यांच्या ‘शैलाच्या कविता’ या काव्यसंग्रहाचा दिमाखदार प्रकाशन सोहळा येथील हॉटेल इट अँड स्टे येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते व प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंबानगरीतील सुप्रसिद्ध मधुमेह तज्ज्ञ तथा साहित्यिक डॉ.शुभदा लोहिया या उपस्थित होत्या. तर मंचावर मराठवाडा पदवीधर मतदार संघ, छत्रपती संभाजीनगरचे माजी आमदार श्रीकांत जोशी, पुणे येथील सुप्रसिद्ध आय.टी.उद्योजक अनिल चैतन्य, प्रकाशक प्रा.अजय चौधरी आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. दीप प्रज्ज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. त्यानंतर व्यासपीठावरील सर्व मान्यवरांसह सिद्धराज देशपांडे, माजी प्राचार्य रा.गो.धाट, ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ प्रा.डॉ.शरद हेबाळकर, डॉ.एन.पी.देशपांडे, व्यंकटेश कुलकर्णी, प्रवीण सरदेशमुख, प्रा.सौ.अर्चना जोशी, जयेंद्र कुलकर्णी, विश्वजीत धाट आदी मान्यवरांचा चौधरी कुटुंबियांच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला. यानंतर सर्व उपस्थित मान्यवरांनी कै.शैलजा चौधरी यांना दोन मिनिटे स्तब्ध राहून श्रद्धांजली अर्पण केली. प्रास्ताविक प्रा.अजय चौधरी यांनी केले. ते म्हणाले की, माझी पत्नी कै.शैलजा ही केवळ माजी सहचारिणीच नव्हती. तर ती एक खंबीर स्त्री होती. जिने आपल्या अल्पायुषी जीवनात नौकरी सांभाळत संपूर्ण कौटुंबिक जबाबदाऱ्या अगदी यशस्वीपणे व समर्थपणे निभावल्या. हा संसाराचा गाडा हाकत असतानाच तिने कालसुसंगत रांगोळ्या काढणे, बॅडमिंटन खेळणे, संगीत शिकणे, चित्र काढणे, शाडूच्या माती पासून गणपती तसेच विविध पर्यावरण पूरक मूर्ती – शिल्पे तयार करणे, तसेच कविता करणे इत्यादी विविध क्षेत्रातील छंद जोपासले होते. साधारणतः वर्ष 2014 पासून त्यांनी कविता लिहायला सुरूवात केली. आज तिने लिहिलेल्या कवितांचा प्रकाशन सोहळा संपन्न होत आहे. तिच्या अचानक जाण्याने एक चैतन्यमय झळाळी थांबली, मात्र तिने केलेले कर्म ती इथेच ठेवून गेली, अशा भावना त्यांनी याप्रसंगी व्यक्त केल्या. त्यानंतर कै.शैलजा चौधरी यांचा संपूर्ण जीवनपट दाखविणारी एक चित्रफित एलईडी स्क्रीनवर उपस्थितांना दाखविण्यात आली व त्यानंतर ‘शैलाच्या कविता’ या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. कै.शैलजा यांचे आतेभाऊ तथा पुणे येथील सुप्रसिद्ध आय.टी.उद्योजक अनिल चैतन्य आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले की, कै.शैलजा यांच्या कवितांमध्ये साधेपणा व गहनता पहावयास मिळते. तिच्या शब्दांमध्ये साधेपणा आहे. त्यांची प्रत्येक कविता वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळी जाणवते. हा त्यातील दैवीपणा आहे. या कविता स्वतःच्या मनातील तक्रारी करणाऱ्या कविता नाहीत तर सुख काय आहे हे सांगणाऱ्या या कविता आहेत, अशा भावना व्यक्त करून त्यांनी सुखानुभव या कवितेचे रसग्रहण केले. डॉ.सौ.कल्पनाताई चौसाळकर आपल्या मनोगतात म्हणाल्या की, कै.शैलजा या सर्जनशीलता, नाविन्यता आणि उत्साह याचे मूर्तिमंत उदाहरण होत्या. त्या प्रचंड मेहनती होत्या. एक स्त्री म्हणून त्यांनी त्यांच्या कार्यालयातून कधीही सवलत घेतली नाही. नौकरीच्या सुरूवातीच्या काळात अत्यंत कठीण परिस्थिती होती, तरीही त्यांनी नेटाने आपले कार्य केले. त्या एक उत्तम सुगरण, अतिशय संवेदनशील असे व्यक्तिमत्त्व होत्या. त्यांच्या मनातील अनेक गुजगोष्टी त्यांच्या कवितेच्या माध्यमातून समोर आल्या, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. प्रमुख अतिथी माजी आमदार श्रीकांत जोशी म्हणाले की, कै.शैलजा यांच्या सर्वच कविता या अंतर्मनाला चालना देणाऱ्या व अत्यंत प्रेरणादायी आहेत. या कवितांचा वाङमयीन दर्जा अत्यंत उच्च आहे. या सर्व कवितांचे सर्वात मोठे वैशिष्ट्ये म्हणजे त्यात असलेली सकारात्मकता होय. आगामी काळात या सर्व कविता सर्वोत्तम संगीतकारांकडून संगीतबद्ध करून गीतांच्या रूपातून आपण सर्वांसमोर आणू अशी ग्वाही त्यांनी याप्रसंगी दिली. भौतिकदृष्ट्या त्या किती वर्ष जगल्या त्यापेक्षा त्या पुढे कितीतरी वर्ष कवितेच्या रूपाने जगणार आहेत असे भावोद्गार त्यांनी याप्रसंगी काढले. याप्रसंगी प्रा.चौधरी यांचे सुपुत्र चि.सोहम व चि.प्रसीद, सुनबाई सौ.पद्मश्री चौधरी, डॉ.सौ.कल्पनाताई चौसाळकर, प्रा.दुर्गादास चौधरी, प्रा.सौ.अर्चना जोशी, व्यंकटेश कुलकर्णी, सिद्धराज देशपांडे आदी मान्यवरांनी कै.शैलजा यांच्या अनेक कवितांचे रसग्रहण करून आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन डॉ.गौरी कुलकर्णी यांनी केले. तर उपस्थितांचे आभार सोहम चौधरी यांनी मानले. कल्याण मंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमासाठी चौधरी कुटुंबियांवर प्रेम करणारे अंबानगरीतील तसेच बाहेर गावाहून आलेले सर्व स्नेही जन, मित्रपरिवार, आप्त – नातेवाईक, शहरातील अनेक मान्यवर प्रतिष्ठित मंडळी, प्राध्यापक साहित्यिक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा.अजय चौधरी यांचे सुपुत्र चि.सोहम व चि.प्रसीद व चौधरी परिवारातील सदस्य यांनी पुढाकार घेतला.