अंधश्रद्धेच्या जोखडातून महिलांना मुक्त करण्याची गरज – जेष्ठ विचारवंत प्रा.अर्जुन जाधव
साहित्यातील स्त्रीरत्ने' हा दर्जेदार संदर्भ ग्रंथ - प्राचार्य डॉ.बाबासाहेब ठोंबरे

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
*प्रा.गौतम गायकवाड लिखित ‘साहित्यातील स्त्रीरत्ने’ ग्रंथाचा प्रकाशन सोहळा*
=======================
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
स्मृतिशेष सागराबाई केरबा गायकवाड यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त अभिवादन व साहित्यिक प्रा.गौतम गायकवाड लिखित ‘साहित्यातील स्त्रीरत्ने’ या ग्रंथाच्या प्रकाशन सोहळा अंबाजोगाई येथे गुरूवार, दिनांक २७ फेब्रुवारी २०२५ आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.बाबासाहेब ठोंबरे (प्राचार्य, कृषी महाविद्यालय, लातूर.) हे होते तर ग्रंथ विमोचन जेष्ठ विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते प्रा.अर्जुन जाधव (लातूर) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ साहित्यिक विश्वंभर वराट गुरूजी (अंबाजोगाई), साहित्यिक प्रा.डॉ.सा.द.सोनसळे (सोनपेठ), साहित्यिक प्रा.डॉ.दिलीप सावंत (नांदेड), साहित्यिक विद्याधर पांडे (अंबाजोगाई), साहित्यिक प्रा.डॉ.बालाजी रूद्देवाड (अंबाजोगाई), साहित्यिक प्रा.डॉ.म.ना.गायकवाड (धाराशिव), लेखक प्रा.गौतम गायकवाड यांची विचारमंचावर प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना जेष्ठ विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते प्रा.अर्जुन जाधव यांनी सांगितले की, लेखक प्रा.गौतम गायकवाड हे महामानव आंबेडकरांचे खरेखुरे अनुयायी आहेत. ते सामाजिक बांधिलकी जोपासत कार्य करीत आहेत. महिलांना केंद्रस्थानी ठेवून ‘साहित्यातील स्त्रीरत्ने’ या ग्रंथाची निर्मिती केली आहे. आज महिलांना अंधश्रद्धेच्या जोखडातून मुक्त करून त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवावा लागेल. हिंदू धर्म, हिंदू संस्कृती व हिंदुत्व याबाबत प्रा.जाधव यांनी आपले विचार मांडले. हिंदू कुणाला म्हणावे याची व्याख्या सांगितली. पुरूषप्रधान व्यवस्थेमुळे स्त्री गुलाम झाली, आजही स्त्रीकडे उपभोगाची वस्तू म्हणून समाज पाहतो हे चुकीचे आहे असे सांगून प्रा.जाधव यांनी ‘साहित्यातील स्त्रीरत्ने’ या ग्रंथातील विविध दाखले दिले. अशा कार्यक्रमांची समाजाला गरज असल्याचे त्यांनी सांगितले. लेखक प्रा.गौतम गायकवाड यांच्याकडे आयुष्यभर जोडलेल्या माणसांचा खजिना असल्याचे जाधव म्हणाले. अध्यक्षीय समारोप करताना डॉ.बाबासाहेब ठोंबरे यांनी प्रा.गौतम गायकवाड यांनी कार्यकर्तृत्वाचा आलेख चढता ठेवला आहे. ते झोकून देऊन काम करीत आहेत. प्रसंगी प्रा.गायकवाड हे मेणाहुनी मऊ व वज्राहून कठीण ही आहे. ते महिलांचा सदोदित सन्मान करणारे व्यक्तिमत्त्व आहे. प्रा.गायकवाड लिखित ‘साहित्यातील स्त्रीरत्ने’ हा ग्रंथ भविष्यात संदर्भ ग्रंथ म्हणून ओळखला जाईल. या ग्रंथातून विकासासाठी महिलांना दिशा मिळेल. या ग्रंथात विविध क्षेत्रात कार्यरत महिलांचा उल्लेख आढळतो. हयातीत आपल्या आईची सेवा करणारे व दिवंगत झाल्यावर स्मरण ठेवणारे प्रा.गौतम गायकवाड हे आधुनिक काळातील भक्त पुंडलिक आहेत. ते कर्ते सुधारक आहेत. असे गौरवोद्गार प्राचार्य डॉ.ठोंबरे यांनी काढले. प्रारंभी तथागत गौतम बुद्ध, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस तसेच स्मृतिशेष सागराबाई केरबा गायकवाड यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त उपस्थित मान्यवर आणि गायकवाड परिवार, नातेवाईक यांच्याकडून पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. बुद्ध-प्रबुद्ध पूजा, अभिवादनानंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी लेखक प्रा.गौतम गायकवाड लिखित ‘साहित्यातील स्त्रीरत्ने’ या ग्रंथाचे विमोचन केले. प्रास्ताविक करताना लेखक प्रा.गायकवाड यांनी कार्यक्रम आयोजन, ग्रंथ निर्मिती बाबतची पार्श्वभूमी सांगितली. विविध संदर्भ व दाखले देत त्यांच्या आयुष्यातील आईचे महत्त्व विशद केले. आई ही जगातील सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे. ज्यांना आई कळते, त्यांना जग कळते. जगात सर्व गुन्हे माफ करणारे मायालय म्हणजे ‘आई’. आई जन्माची शिदोरी आहे. आई या दोन अक्षरी शब्दांत जगाचे तत्वज्ञान सामावलेले आहे. आई कोणत्याही शब्दात मांडले तरी आईचे परिपूर्ण रूप साकारू शकत नाही. ‘शर्थ लगी जब ‘सारी दुनिया’, एक शब्द मे लिखने कि, घूंड रहे वो सारी किताबे, मैने माँ का नाम लिखा ।’ त्यामुळेच मानवी जीवनात स्त्री ही प्रमुख असते असे सांगून मुलगा जगायला भाग पाडतो. तर मुलगी जगणं शिकवते. मुलीच्या ठायी आईसारखी माया असते असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी विश्वंभर वराट यांनी प्रा.गायकवाड हे हळवे व्यक्तीमत्व असल्याचे सांगितले., प्रा.डॉ.सा.द.सोनसळे यांनी आई हे निसर्गाला पडलेलं सुंदर स्वप्न आहे असे उद्बोधक विचार मांडले. तर प्रा.डॉ.दिलीप सावंत यांनी प्रा.गायकवाड यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. विद्याधर पांडे यांनी स्वरचित कविता सादर केल्या. प्रा.म.ना.गायकवाड यांनी ‘साहित्यातील स्त्रीरत्ने’ या ग्रंथातून मौलिक चिंतन मांडले असल्याचे सांगितले. यावेळी प्रा.बालाजी रूद्देवाड यांनी ही समायोचित मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास अंबाजोगाई शहर व परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात खोलेश्वर महाविद्यालयाच्या वतीने आप्पाराव यादव, डॉ.दिगंबर मुडेगावकर, प्रा.पोखरकर, डॉ.दिपक फुलारी, डॉ.देविदास खोडेवाड, यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या वतीने प्रा.डॉ.मुकुंद राजपंखे, आचार्य दादा, प्राचार्य किसनराव पवार, विद्याधर पंडित, नातेवाईक, मित्र परिवार यांच्याकडून प्रा.गौतम गायकवाड यांचा ह्रदय सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल सुरवसे यांनी केले तर उपस्थितांचे आभार लेखक प्रा.गौतम गायकवाड यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी दिलीप गायकवाड, आर.जी.गायकवाड, जगन सरवदे, प्रा.बी.एस.बनसोडे, नागेश जोंधळे आदींसह मित्र परिवार व गायकवाड कुटुंबियांच्या वतीने पुढाकार घेण्यात आला.