सद्भावना यात्रेला बीड जिल्ह्यातील नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद
बीड जिल्ह्यात कांग्रेस विचारधारेला पुन्हा नवसंजीवनी

अंबाजोगाई/प्रतिनिधी प्रा.दत्ता जाधव
महाराष्ट्र काँग्रेसने पुढाकार घेऊन सुरू केलेल्या सद्भावना यात्रेचा पहिला टप्पा बीड जिल्ह्यातून सुरू झाला. यामध्ये महिला दिना दिवशी केज तालुक्यातील मस्साजोग ते बीड अशा सद्भावना पद यात्रेला सुरुवात झाली. अतिशय मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळालेल्या या सद्भावना यात्रेचा पहिला टप्पा पूर्ण झाला.
केज तालुक्यातील मस्साजोग येथुन सकाळी नऊ वाजता सद्भावना पद यात्रेला सुरुवात झाली. यावेळी सर्वप्रथम स्वर्गीय संतोष देशमुख यांना आदरांजली वाहून छत्रपती शिवाजी महाराज तसेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यानंतर सेवा दलाचे ध्वजारोहण संपन्न झाल्यानंतर पदयात्रा बीड कडे मार्गस्थ झाली. यावेळी या पदयात्रेसाठी सुमारे पाच हजार नागरिकांनी सहभाग नोंदवला आणि प्रत्यक्ष पद यात्रेमध्ये चालायला सुरुवात केली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार रजनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही पदयात्रा सुरू झालेली आहे.तर सदरील पदयात्रा यशस्वी करण्यासाठी बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल सोनवणे यांनी मोठ्या प्रमाणावर संघटन करू आणि परिश्रम घेऊन पदयात्रेतील अर्धा टप्पा यशस्वीपणे पूर्ण केलेला आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची पदयात्रे संबंधी असलेली संकल्पना यावेळी दिसून येत होती. यात्रेला सुरुवात झाल्यानंतर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर पद यात्रेचे स्वागत झाले आणि आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर पद यात्रेमध्ये सहभाग नोंदवला. मस्साजोग पासून वीस किलोमीटर अंतरावर आल्यानंतर दुपारी ढोणे मंगल कार्यालयामध्ये सर्वांनी भोजन करून विसावा घेतला. नंतर पाच वाजता पदयात्रा मार्गस्थ झाली. नेकनुर येथे सदरील पद यात्रेचा मुक्काम करुण आज रविवारी सकाळी साडेआठ वाजता सद्भावना पदयात्रा बीड कडे मार्गस्थ झाली आहे.
दरम्यान सदरील पद यात्रेमध्ये सहभागी झालेल्या सर्व नागरिकांनी कसल्याही प्रकारची तप्त उन्हाची तमा न बाळगता सामाजिक सलोखा निर्माण व्हावा या हेतूने मार्गक्रमण सुरू केलेली दिसून येत होते.नेकनूर येथून सकाळी महाराष्ट्र गीत ,राष्ट्रगीत घेऊन बिडकडे मार्गस्थ झाली आहे.