आपला जिल्हासामाजिक

बीड जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी : नवीन रेल्वेमार्ग सर्वेक्षणास निधी मंजूर

धाराशिव-बीड-संभाजीनगर रेल्वे मार्ग होणार, रेलबोर्डाचे चेअरमनसोबत खा.सोनवणेंनी केली ऑनलाईन पाहणी

बीड: उस्मानाबाद (धाराशिव)-बीड-औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) रेल्वे लाईन प्रकल्पाला मंजुरी देण्याची मागणी निवडून आल्यापासून खा. सोनवणे हे सातत्याने रेल्वेमंत्री व रेल बोर्डाकडे करत आहेत. या मागणीची दखल घेत रेल्वेमार्गाची तपासणी करण्याचे आदेश दि. १० फेब्रुवारी रोजी रेल्वे मंत्री यांनी संबंधित संचालकांना दिले होते. आता संबधित रेल्वे मार्गाचे सर्व्हेक्षण करण्यास मंजूरी देण्यात आली असून सर्व्हेक्षणासाठी रु. ६ कोटी निधीस मंजुरीचे आदेश देण्यात आले आहेत. रेल्वे बोर्डाचे चेअरमन सतिश कुमार यांच्या कार्यालयात खा.सोनवणे यांनी रेल्वे मार्गाची ॲानलाईन पाहणी केली.

खा.बजरंग सोनवणे यांनी दि.१० फेब्रुवारी रोजी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांना भेट घेतली होती. यावेळी उस्मानाबाद-बीड-औरंगाबाद नवीन मार्ग प्रकल्पाचा अहवाल रेल्वे बोर्डाला सादर करण्यात आलेला असून या प्रकल्पाची एकूण लांबी २४०.१५ किमी आहे. ज्याचा अंदाजे खर्च ४८५७.४७ कोटी रुपये असल्याचे निदर्शनास आणून दिले. मराठवाडा प्रदेशात अखंड कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यासाठी, प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी आणि व्यापार आणि उद्योगासाठी नवीन मार्ग उघडण्यासाठी हा रेल्वे मार्ग महत्त्वाचा आहे, हे पटवून दिले होते. केंद्रीय रेल्वेमंत्री यांनी पत्राव्दारे या प्रकल्पास मंजुरी देण्याबाबत प्रकल्पाची व्यवहार्यता व सुविधा तपासणी करण्याचे निर्देश संबंधित संचालक यांना दिले होते. यानंतर आता केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयाने धाराशिव (उस्मानाबाद)-बीड-छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) या २४० किमी नवीन रेल्वे मार्गांसाठी अंतिम सर्वेक्षणास मंजुरी दिली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी ६ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा रेल्वे मार्ग मराठवाड्याच्या दळणवळणाच्या सोयींमध्ये मोठी क्रांती घडवेल आणि विकासाला गती देणार आहेच पण बीड जिल्ह्याच्या तसेच मराठवाड्याच्या प्रगतीसाठी हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. हा रेल्वेमार्ग व्हावा, यासाठी खा.बजरंग सोनवणे हे जुलै २०२४ पासून (उस्मानाबाद) धाराशिव-बीड-छत्रपती संभाजीनगर ( औरंगाबाद) अशा २४० किलोमीटर नवीन रेल्वेमार्गाच्या मागणीसाठी सातत्याने रेल्वे मंत्री व रेल बोर्डाकडे पाठपुरावा करत आहेत. आज मंगळवार दि.११ मार्च रोजी रेल बोर्डाचे चेअरमन सतिषकुमार यांचे सोबत या रेलमार्गाची ॲानलाईन पाहणी केली.

०००

बीडला मराठवाड्यातील सर्वात मोठे जंक्शन

पुर्व-पश्चिम रेल्वे मार्गाचे काम सुरू आहेच पण आता दक्षिण-उत्तर रेल्वेमार्गाचेही सर्वेक्षण होत असून या कामाला गती मिळेल. दोन्ही रेल्वे मार्ग झाल्यास बीडमध्ये मराठवाड्यातील सर्वात मोठे जंक्शन होणार आहे. अहिल्यानगर-परळी रेल्वेमार्गाबरोबरच धाराशिव-बीड-संभाजीनगर रेल्वेमार्गही बीड जिल्ह्यासाठी विकासाच्या दृष्टीने मोठा फायदेशीर ठरणार आहे.

००

रेल्वे बोर्डाचे चेअरमन सतिश कुमार यांच्या कार्यालयात रेल्वे मार्गाची ॲानलाईन पाहणी केली. रेल्वेमार्गाविषयी सविस्तर चर्चा केली. हा रेल्वेमार्ग लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्नशील राहील.

-खा.बजरंग सोनवणे, बीड.

००

पाठपुरावा करावा तो खा.सोनवणेंनी: वाघ

खा.बजरंग सोनवणे यांना लोकसभा निवडणूकीत जिल्ह्यातील सुजान नागरिकांनी निवडून दिले, याचा मतदार व जिल्ह्यातील रहिवासी म्हणून अभिमान वाटत आहे. गेल्या वर्षभराच्या आतच त्यांनी बीड रेल्वेसाठी पाठपुरावा केला. आहिल्यानगर-बीड-परळी बंद असलेली कामे चालू करुन गतीने काम पूर्णत्वास जात आहे. नवीन रेल्वेमार्गासाठी देखील त्यांनी जो पाठपुरावा केला आहे, तो कमालीचा आहे. पाठपुरावा करावा तो खा.बजरंग सोनवणे यांनीच. याच पाठपुराव्याचे हे फळ आहे, अशी प्रतिक्रिया बीड येथील नागरिक शरद वाघ यांनी दिली आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.