महामार्गाचे काम तातडीने सुरु करण्याच्या मागणीसाठी टॉवरवर चढून आंदोलन

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
सोनपेठ/प्रतिनिधी
पाथरी ते इंजेगाव या राष्ट्रीय महामार्गाचे काम तातडीने सुरु करावे या मागणीसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सभेदरम्यान नागरिकांनी टॉवरवर चढून लक्षवेधी आंदोलन केले.
केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी हे परभणी जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गांच्या कामाचे उद्घाटन करण्यासाठी परभणी येथे आले असताना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 ब मधील पाथरी ते इंजेगाव या भागाचे काम गेल्या सात वर्षा पासून प्रलंबित आहे. पाच वर्षांपूर्वी नितीन गडकरी यांनी या कामाचे उद्घाटन केले होते.पण या रस्त्यावर एक खडाही टाकला नाही. या भागातील रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली आहे. या महामार्गावरील खड्डयामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. शनिवारी (दि.25) गडकरी यांच्या सभे दरम्यान त्यांचे लक्ष या प्रलंबित कामाकडे वेधण्यासाठी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुधीर बिंदू यांच्या नेतृत्वाखाली विश्वंभर गोरवे, सोमनाथ नागुरे हे विटा पुलाजवळील मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन केले. केंद्रीय मंत्री गडकरी यांचे भाषण सुरु होताच कार्यकर्ते टॉवरवर चढले. टॉवरवर चढून त्यांनी पाथरी इंजेगाव रस्ता तातडीने सुरु करण्याच्या घोषणाबाजी केली.
या आंदोलनाची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुनील रेजीतवाड, फौजदार अमर केंद्रे ,कुंडलिक वंजारे व गृहरक्षक दलाच्या जवानांनी आंदोलन कर्त्यांना खाली उतरवले यावेळी नायब तहसीलदार अनिल घनसावंत हे ही या ठिकाणी उपस्थित होते. परभणीत गडकरी यांचे भाषण संपल्यावर उपस्थित अधिकार्यांनी मंत्र्यांनी भाषणात रस्त्यासाठी निधीची घोषणा केल्याची माहिती दिल्यानंतर आंदोलनकर्ते खाली उतरले. त्यानंतर कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले व पोलीस स्थानकात नेऊन कारवाई करून सोडले.
निधीच्या घोषणा व उद्घाटने नेहमीचीच
पाथरी ते इंजेगाव या रस्त्याचे उद्घाटन हे नितीन गडकरी यांनी पाच वर्षांपूर्वी केले होते. आता पुन्हा या रस्त्याला निधी उपलब्ध करण्याची घोषणा ही तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे. या रस्त्याचे काम तातडीने सुरु करावे ही नागरीकांची मागणी आहे ती तातडीने पुर्ण करावी अन्यथा तीव्र आंदोलन करू
-सुधीर बिंदू,आंदोलनकर्ते