जयंतीनिमित्त आयोजित स्पर्धेतील विजेत्या संघांना पारितोषिकांचे वितरण
धम्मचक्र बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे घेण्यात आल्या स्पर्धा

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज डिजिटल मिडिया
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
येथील धम्मचक्र बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त आयोजित मिरवणूक व विविध स्पर्धेतील विजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
धम्मचक्र बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त आयोजित विविध स्पर्धेचे परीक्षण करण्यात आले. मिरवणूक स्पर्धेचे परीक्षक म्हणून दत्ता देवकते, मनेष गोरे, बाळासाहेब म्हस्के, पिराजी कुसळे यांच्या सोबतच संस्थेचे सदस्य गंगाराम ओहाळ, मनात भोसले यांनी अंबाजोगाईतील सर्व जयंती मंडळांना स्वतः भेट देऊन परीक्षण केले होते. त्यामध्ये अंबाजोगाई शहरातील सिद्धार्थनगर जयंती उत्सव समिती (प्रथम क्रमांक) तर डॉ.बाबासाहेब आंबेडकरनगर नवीन मोरेवाडी (द्वितीय क्रमांक), संत कबीरनगर (तृतीय क्रमांक) हे संघ विजेते ठरले. सामुहिक महिला गट टिपरी – रमाई चौक (प्रथम क्रमांक), वैयक्तिक नृत्य लहान गट – वेदा कृष्णा वाघमारे (प्रथम क्रमांक), तसेच अंबाजोगाई शहरातील देखाव्यांमध्ये भीमनगर, परळी वेस (प्रथम क्रमांक), डॉ.बाबासाहेब आंबेडकरनगर नवीन मोरेवाडी (द्वितीय क्रमांक) यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. यावेळी संत कबीरनगर भागातील काही विद्यार्थी विविध सरकारी सेवेमध्ये रूजू झाले. त्यापैकी १) सुजाता प्रकाश कसबे (इन्कम टॅक्स ऑफिसर), २) लक्ष्मण धोत्रे (महाराष्ट्र पोलिस), ३) रत्नदीप संजय कांबळे (विद्युत सहाय्यक) या गुणवंतांचा संस्थेच्या मार्फत यशवंतराव चव्हाण महाविद्यालयासमोरील महावितरण कार्यालयाजवळ आयोजित एका विशेष कार्यक्रमात यथोचित सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार पृथ्विराज साठे, माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, बीड जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती राजेसाहेब देशमुख, ज्येष्ठ नेते कॉ.बब्रुवाहन पोटभरे, आरपीआय नेते महेंद्र निकाळजे, सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले, माजी जि.प.सदस्य पंडीत अण्णा जोगदंड, प्रवीण देशमुख, भिमराव सरवदे, संघटनेचे प्रवीण जगताप, गणेश भोसले, माजी नगरसेवक संतोष शिनगारे, माजी नगरसेवक दिनेश भराडीया, सचिन जाधव या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. या उपक्रमासाठी अंबाजोगाई येथील कर्तव्यदक्ष उपजिल्हाधिकारी दीपक वजाळे यांनी विधायक उद्देशाने धम्मचक्र बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेला सहकार्य म्हणून पाच हजार रूपयांची पुस्तके भेट म्हणून दिली. त्याबद्दल संस्थेच्या वतीने सन्माननीय उपजिल्हाधिकारी महोदयांचे आभार मानण्यात आले. तर ‘महाराष्ट्रात गाजले एक नांव, अंबाजोगाई पुस्तकांचे गांव’ या संकल्पनेतून सर्व प्रमुख पाहुण्यांना संस्थेतर्फे पुस्तकं भेट म्हणून देण्यात आली. यावेळी गायक सुभाष शेप, गायिका मयुरी यांनी प्रबोधनपर भीम व बुद्ध गीते सादर केली. सदरील कार्यक्रमाच्या संयोजनामध्ये धम्मचक्र बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष राहुल मस्के, सचिव सुगत सरवदे, सदस्य सचिन वाघमारे, अमोल सरवदे, रवींद्र जोगदंड, राजकुमार मस्के, गंगाराम ओहाळ, किरण गायकवाड, तौसिफ सिद्दिकी, धीरज सरवदे यांनी सहकार्य केले. हा उपक्रम कबीरनगरच्या तरूण पिढीसाठी दिशादर्शक ठरणारा आहे. डॉ.आंबेडकर जयंतीत त्यांनी डिजे लावला नाही, तर लोकप्रबोधनाचा कार्यक्रम मिरवणुकीत दाखविला, विविध स्पर्धा घेतल्या व कर्णकर्कश आवाज मुक्त जयंती काढली त्यांना बक्षीसे ही दिली. सदरील कार्यक्रमास या भागातील महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक आणि तमाम जनतेने मोठा प्रतिसाद दिला. विचार आंदोलन आणि चळवळ या केंद्राला अनुसरून भीमजयंती निघावी व जयंती खुद्द एक वैचारिक आंदोलन बनावे यासाठी ज्येष्ठ नेते कॉ.बब्रुवाहन पोटभरे यांच्यासह उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवरांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेणाऱ्या धम्मचक्र बहुउद्देशिय संस्था व त्यांच्या सर्व पदाधिकारी, सदस्य आणि कबीरनगरच्या प्रवर्तनवादी विचार जोपासणाऱ्या तरूणांचे विशेष अभिनंदन केले. अतिशय भारावलेल्या वातावरणात या कार्यक्रमाचा समारोप झाला.