उज्जोत प्रिमियर लीग – २०२५ चे अंबाजोगाईत आयोजन
नवकेशर सुपर किंगची विजयी सलामी ; सचिन उपाडे ठरले 'मॅन ऑफ द मॅच

वैभवशाली क्रीडा विश्व
अंबाजोगाई (प्रतिनिधी)-
येथील उज्जोत फाऊंडेशन आणि योगेश्वरी क्रीडा प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘उज्जोत प्रिमियर लीग – २०२५’ चे अंबाजोगाईत आयोजन करण्यात आले आहे. सुरूवातीच्या सामन्यात नवकेशर सुपर किंगने विजयी सलामी देत २ षटके राखून १३ षटकांत (ओव्हर) मध्ये ८७ धावा काढून सामना जिंकला. तर आर.आर.पॉलिटेक्निक संघाने ८३ धावा काढल्या. या सामन्यात नवकेशर सुपर किंगचे गोलंदाज सचिन उपाडे हे ३ षटकांत (ओव्हर) मध्ये ११ धावा देत आणि २ विकेट घेत ‘मॅन ऑफ द मॅच’ ठरले. उज्जोत प्रिमियर लीगला क्रिकेट प्रेमींचा भरभरून प्रतिसाद लाभत आहे.
अंबाजोगाई शहरातील श्री योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या भव्य राजमाता जिजाऊ मैदानावर उज्जोत फाऊंडेशन आणि योगेश्वरी क्रीडा प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘उज्जोत प्रिमियर लीग – २०२५’ चे अंबाजोगाईत आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा रविवार, दिनांक २५ मे २०२५ पासून सुरू झाल्या आहेत. ‘उज्जोत प्रिमियर लीग – २०२५’ मध्ये नवकेशर सुपर किंग, अजिंक्य सिसी, आर.आर.पॉलिटेक्निक, द लिगल ईगल, आयडियल क्रिकेट क्लब आणि विराट वायपर्स या सहा संघांनी सहभाग घेतला आहे. हे सामने सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत या वेळेत लेदर बॉलवर खेळवले जात आहेत. या सामन्यांचे पंच (अंपायर) म्हणून संघर्ष इंगळे आणि अशोक खाडे यांनी काम पाहिले. तर सामन्याचे बहारदार समालोचन (कॉमेंट्री) ज्योतिराम परळकर यांनी केले. नवकेशर सुपर किंग आणि आर.आर.पॉलिटेक्निक या दोन्ही तुल्यबळ संघात झालेल्या सुरूवातीच्या सामन्यात आर.आर.पॉलिटेक्निक संघाने ८३ धावांचे लक्ष नवकेशर समोर ठेवले होते. नवकेशर सुपर किंग संघाने विजयी सलामी देत २ षटके राखून १३ षटकांत (ओव्हर) ८७ धावा काढून हे आव्हान लिलया पेलत अखेर विजयाची बाजी मारली. या सामन्यात नवकेशर सुपर किंग संघाचे प्रमुख भिमाशंकर शिंदे, कर्णधार धम्मानंद वैद्य, अष्टपैलू खेळाडू डॉ.राजेश इंगोले, प्रा.अनंत कांबळे, विक्रमसेन आगळे, प्रदीप जाधवर, सचिन उपाडे, दर्शन पठाडे, दुर्वांक रघू, नवाजीस अली, ऋषिकेश काटुळे, आज्जू खान, अद्वैत देशपांडे, चेतन माने, आदि शिंदे आणि यश खरात या खेळाडूंनी दिमाखदार कामगिरी करीत ‘उज्जोत प्रिमियर लीग – २०२५’ मध्ये विजयी सुरूवात केली आहे. आर.आर.पॉलिटेक्निक संघाने नवकेशर सुपर किंग संघाला १५ षटकांत (ओव्हर) विजयासाठी ८४ धावांचे लक्ष दिले. परंतु, नवकेशर सुपर किंगने २ षटके राखून १३ षटकांत (ओव्हर) मध्ये ८७ धावा काढून सहज विजय मिळवला. हा रोमहर्षक सामना पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमींनी मैदानावर मोठी गर्दी केली होती. योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या राजमाता जिजाऊ मैदानात सुरू असलेल्या या क्रिकेट स्पर्धा अत्यंत जल्लोषात व अनोख्या उत्साहाच्या वातावरणात सुरू आहेत.