गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी खाजगी कोचिंग क्लासेस समोर तक्रार निवारण पेटी बसवा
पोलीस निरीक्षकांना सामाजिक कार्यकर्ते भीमसेन लोमटे व अशोक गंडले यांचे निवेदन

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी खाजगी कोचिंग क्लासेस समोर तक्रार निवारण पेटी बसवा अशी मागणी भीमसेन लोमटे व अशोक गंडले यांनी पोलीस निरीक्षक, अंबाजोगाई यांना मंगळवारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
सध्या बीड जिल्ह्यात खासगी कोचिंग क्लासेसचा विषय वाढत्या गैरप्रकारांनी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. याबाबत अंबाजोगाई येथील सामाजिक कार्यकर्ते भीमसेन (अप्पा) दाजीसाहेब लोमटे व अशोक (भाऊ) गंडले यांनी पोलीस निरीक्षक, अंबाजोगाई यांना मंगळवार, दिनांक १ जुलै रोजी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, खाजगी शिकवणी वर्गातील मुला-मुलींची संख्या लक्षणीय वाढलेली आहे व या अनुषंगाने गैरप्रकारांत वाढ झालेली आहे. सामाजिक भीती पोटी अन्यायग्रस्त मुले व मुली निमूटपणे सहन करतात. हे मागील काही दिवसांपासून समोर आलेल्या घटनेवरून अधोरेखित होते आहे. अशा घटनांना व अन्यायाला आळा बसविण्यासाठी आपण प्रत्येक खाजगी क्लासेस चालकांना बंद तक्रार पेटी बसविण्यास सक्तीचे करावे व सदरील तक्रार पेटीची दर ८ दिवसांनी आपल्या कार्यालयामार्फत तपासणी करण्यात यावी, जेणे करून भविष्यात घडणाऱ्या गुन्ह्यांना आळा बसेल, कोचिंग कक्लासेसचे सी.सी.टी.व्ही फुटेज वेळोवेळी पोलिसांकडून चेक करण्यात यावेत, व तेथे पोलीस गस्त वाढविण्यात यावी जेणे करून मारामारी, छेडखानी अशा घटनांना आळा बसेल. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते भीमसेन लोमटे व अशोक गंडले यांनी सदरील निवेदनातून केली आहे. या निवेदनावर भीमसेन (अप्पा) दाजीसाहेब लोमटे, अशोक (भाऊ) गंडले, श्रीकांत कदम यांची स्वाक्षरी आहे. निवेदन देताना बुध्दकरण जोगदंड, शिंगणकर सर, महेश मगर, अनिल जोगदंड, प्रल्हाद उबाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.