शासकीय आय.टी.आय आणि एस.टी.आगाराचे खासजीकरण करू नका
बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
शासकीय आय.टी.आय आणि एस.टी.आगाराचे खासजीकरण करू नका सदरचा प्रस्ताव तात्काळ थांबवा अशी मागणी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपजिल्हाधिकारी, अंबाजोगाई यांच्या मार्फत सोमवारी दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना सोमवार, दिनांक ३० जुन २०२५ रोजी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, महाराष्ट्र सरकारचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी नुकतीच एक बैठक बोलावून शासकीय आय.टी.आय. हे खासगी कंपनीकडे दत्तक देण्याचा निर्णय केलेला आहे. याचा आम्ही जाहिर निषेध करीत आहोत. सर्वप्रथम आय.टी.आय. या शिक्षणाचा उद्देश काय आहे हे पहावे लागेल. ‘कुशल कामगार तयार करणे व विद्यार्थ्यांना स्ववलंबी बनविणे’ हे आय.टी.आय.चे उद्दिष्ट असते. राज्यात शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था ४१९ आहेत. तर खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था ५८८ आहेत. या संस्थांमध्ये दरवर्षी जवळपास १ लाख ५० हजार विद्यार्थी प्रवेश घेतात आणि कुशल कामगार बनून बाहेर पडतात. आय.टी.आय मध्ये प्रवेश घेण्याचा विद्यार्थ्यांचा कल वाढलेला असून त्याचे कारण, विद्यार्थ्यांना आय.टी.आय. करीत असताना १२ वी ची परीक्षा देण्याची सवलत देण्यात आलेली आहे आणि आय.टी.आय. झाल्यास अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षांला थेट प्रवेश मिळण्याची सोय सुद्धा करण्यात आलेली आहे. मात्र सरकारचे म्हणणे आहे की, आय.टी.आय.ला प्रवेश घेवू इच्छिणाऱ्यांचे प्रमाण फार कमी झालेले आहे. हे साफ चूकीचे आहे. त्याचे कारण कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाकडून आय.टी.आय. मध्ये सार्वजनिक खासगी भागीदारीला प्रोत्साहन देण्यासाठी नागपूर येथे मंत्री व अधिकारी यांनी बैठक घेऊन कालबाह्य अभ्यासक्रम, जुने तंत्रज्ञान, प्रशिक्षणाच्या अभावामुळे कुशल कारागीर देण्यास शासकीय आय.टी.आय. मागे पडत आहेत. असे मत व्यक्त केलेले आहे. हे खोटे असून सरकारचे मत हे नाकर्तेणाचे लक्षण दिसत आहे. शासकीय आय.टी.आय. मध्ये शिक्षक नेमणूकीची आवश्यकता भासणार नाही. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात बेकारीला सामोरे जावे लागणार आहे. तसेच शासकीय आय.टी.आय. कडे आज रोजी मोठ्या प्रमाणात सरकारी जमीनी आहेत. त्या जमीनीवर खाजगी कंपन्या आपले उद्योग उभे करून सरकारची मालमत्ता कमी पैशाने हडप करू शकतात आणि वेगळी ज्यादा फीस आकारण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य सरकारने शासकीय आय.टी.आय. हे खासगी कंपनीच्या घशात घालण्याचे पाप करू नये. तसेच दुसरा मुद्दा असा की, महाराष्ट्रातील एस.टी.आगाराच्या जागेच्या खासगीकरणाचा घाट परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घातलेला आहे. महाराष्ट्रातील तालुक्याच्या किंवा लहान शहराच्या मध्यभागी एस.टी.आगाराच्या मालकीच्या हजारो एकर जागा आहेत. त्याला भारताचे नियंत्रक महालेखा परीक्षकांनी (कॅग) यांनी सरकारी जागांचे खासगीकरण करताना योग्य प्रकारे त्याची दखल घेतली जात नाही असे ताशेरे केले आहेत. त्या जागा उद्योगपतींना देण्यासाठीच सरकारची खटाटोप चालू आहे. एस.टी. ही गोरगरीब लोकांची जीवनवाहीनी आहे. तिला आर्थिक संकटातून बाहेर काढण्याऐवजी सरकारने ते उद्योगपतींच्या घशात घालण्याचा घाट घातला आहे. त्या ऐवजी महाराष्ट्र सरकारने तुकाराम मुंडे यांच्यासारख्या कर्तव्यकठोर, प्रामाणिक अधिकाऱ्याची समिती नेमून सरकारनेच स्वतः त्या एस.टी.आगाराच्या जागेचा विकास करावा. त्यामुळे एस.टी. आर्थिक तोट्यातून बाहेर पडण्यास मदत होईल आणि खासगीकरण थांबविता येईल. कारण, यापुर्वी खासगीकरणातून विकसीत करण्यात आलेल्या एस.टी.च्या जागेचा पुर्वानुभव फारसा चांगला नसल्याचे एस.टी.च्याच अधिकाऱ्यांकडून वेळोवेळी सांगण्यात आले आहे. श्वेतपत्रिका काढून एस.टी.कशी नफ्यात आणतो आहोत हे आशेचे गाजर फसवे आहे. विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे जेव्हा विरोधी पक्षनेता होते. तेव्हा त्यांनी ‘महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे’ सरकार मध्ये विलिनीकरण करण्याची मागणी केली होती. तेच मा.देवेंद्रजी फडणवीस आता मुख्यमंत्री असताना मात्र एस.टी.महामंडळाच्या जागा ह्या विकासाच्या नांवावर उद्योगपतींना कवडीमोल किंमतीमध्ये विकण्याचा घाट घालत आहेत. हे खासगीकरण थांबविले नाही. तर बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे संस्थापक अध्यक्ष ऍड.डॉ.सुरेश माने साहेब यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फार मोठे आंदोलन उभे करील. आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील. असा इशारा बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव ऍड.माणिक बन्सी आदमाने (अंबाजोगाई) यांनी दिला आहे. सदरील निवेदनावर ऍड.वसंत हजारे, राजाभाऊ आदमाने, भारत (मामा) होके, अमोल तरकसे, अविनाश ओव्हाळ, प्रकाश शिंदे, लक्ष्मण वाघे, विठ्ठल तरकसे, सचिन मस्के, सिध्दार्थ होके, बाळासाहेब होके, अमर होके, अशोक शिंगाडे, सुनिल होके, अमोल आदमाने, प्रमोद आदमाने आणि अरविंद आदमाने यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.