माणुसकी सेवा फाऊंडेशनच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी प्रकाश वेदपाठक यांची नियुक्ती
सामाजिक बांधिलकी, प्रशासनात सुसंवाद आणि शेवटच्या घटकांसाठी संघर्षरत नेतृत्व

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) संलग्न माणुसकी सेवा फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी प्रकाश वेदपाठक यांची नियुक्ती नुकतीच करण्यात आली. सामाजिक कार्यात सक्रिय आणि ग्रामीण भागातील जनतेच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविणाऱ्या व्यक्तिमत्त्वाची ही योग्य निवड असल्याचे सर्वत्र मानले जात आहे. वेदपाठक यांच्या निवडीचे सर्वस्तरांतून स्वागत होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष, प्रवक्ते व माणुसकी सेवा फाऊंडेशनचे महाराष्ट्र अध्यक्ष महेश भाऊ शिंदे यांच्या हस्ते अधिकृत नियुक्तीपत्राद्वारे प्रकाश वेदपाठक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महेशभाऊ शिंदे हे सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री ना.अजितदादा पवार यांचे विचार व धोरणे तळागाळात पोहोचविण्यासाठी महाराष्ट्रासह संपूर्ण मराठवाड्यात झंजावाती संवाद दौरे करीत आहेत. सामाजिक माध्यमातून प्रशासन, शासकीय योजना आणि विकासाचे मॉडेल ग्रामीण जनतेपर्यंत पोहोचविणे, जनतेच्या अडचणी प्रशासनापर्यंत नेऊन त्या मार्गी लावणे, आणि सामान्य नागरिकाचे जीवनमान उंचाविण्यासाठी ते अहोरात्र झटत आहेत. माणुसकी सेवा फाऊंडेशन हे समाजासाठी समर्पित कार्य करणारे आहे. या दूरदृष्टीमुळेच माणुसकी सेवा फाऊंडेशनने प्रत्येक जिल्हा, तालुका व ग्रामीण पातळीवर शाखा स्थापनेचे अभियान हाती घेतले आहे. सामाजिक जाणीवा असलेले कार्यकर्ते, युवक व महिलांचा सक्रिय सहभाग यातून घडतो आहे. संस्थेचे कार्यक्षेत्र केवळ सामाजिक मदतीपुरते न राहता शासकीय योजनांचे प्रबोधन, आरोग्य शिबिरे, शिक्षणवाढ, शेतकऱ्यांसाठी कृषी मार्गदर्शन, महिला व बालकल्याण, व्यसनमुक्ती, रोजगार निर्मिती यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर आधारित आहे. आपल्या निवडीबद्दल आमच्या प्रतिनिधीशी बोलताना प्रकाश वेदपाठक यांनी सांगितले की, ‘माझी ही नियुक्ती म्हणजे पदापेक्षा जबाबदारी ही मोठी आहे. समाजातील शेवटच्या माणसापर्यंत शासनाच्या विविध योजना आणि न्याय पोहोचविणे हेच माझे ध्येय आहे. सन्माननीय महेश भाऊंनी माझ्यावर दाखविलेला विश्वास मी प्रत्यक्ष कामातून सिद्ध करीन,’ असे आश्वासन प्रकाश वेदपाठक यांनी आपल्या निवडीनंतर उपस्थितांशी संवाद साधताना व्यक्त केले. वेदपाठक यांच्या निवडीचे बीड जिल्ह्यातून उत्स्फूर्त स्वागत करण्यात येत आहे. या निवडीनंतर अंकुश गंगावणे (बीड जिल्हाध्यक्ष), संजय तेलंग, सय्यद अमजद, प्रवीण सोळंके, शेख नासेर, रवी उबाळे, महेश वेदपाठक आदींसह अनेक पदाधिकाऱ्यांनी प्रकाश वेदपाठक यांना शुभेच्छा देवून त्यांचे अभिनंदन केले.