खोलेश्वर महाविद्यालयात 16 ऑक्टोबर रोजी माधव भंडारी लिखित पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
साहित्य निर्मितीतून राष्ट्रभक्तीचा संचार मनावर व्हावा, राष्ट्रीय विचारांची घुसळण होऊन साहित्य रसिकांचे प्रबोधन व्हावे या हेतूने साहित्य प्रेमी वाचकांसाठी लेखक माधवजी भंडारी (मुंबई) लिखित “डाव्यांचा खरा चेहरा” या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या खोलेश्वर महाविद्यालयात स्व.गोपीनाथराव मुंडे सभागृहात दिनांक 16 ऑक्टोबर 2022 रोजी, सकाळी 11 वाजता करण्यात आले आहे.
मागील चार दशकांपासून साहित्य क्षेत्रामध्ये मराठी साहित्यातून राष्ट्रभक्ती निर्माण व्हावी या हेतूने मराठवाडा साहित्य मंच कार्यरत आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंदडा हे मान्यवर उपस्थित राहणार असून टी.बी. गिरवलकर अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.आय.खडकभावी यांच्या हस्ते “डाव्यांचा खरा चेहरा” या पुस्तकाचे प्रकाशन संपन्न होणार आहे. या प्रसंगी पुस्तकाचे लेखक माधवजी भंडारी यांचे व्याख्यान होणार आहे. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत संयोजक प्रवीणजी सरदेशमुख यांची देखील प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तरी सर्व साहित्य प्रेमींनी या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन मराठवाडा साहित्य मंच बीडचे जिल्हा संयोजक माजी प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे तसेच जिल्हा सहसंयोजक डॉ.निशिकांत पाचेगावकर यांनी केले आहे. सदरील कार्यक्रम हा खोलेश्वर महाविद्यालयातील स्व.गोपीनाथराव मुंडे सभागृहामध्ये संपन्न होणार आहे.