खोलेश्वर महाविद्यालयात स्व.नाना पालकर वक्तृत्व स्पर्धेचा समारोप
राज्याच्या विविध भागातून स्पर्धकांचा सहभाग

अंबाजोगाई (वार्ताहर)
येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या खोलेश्वर महाविद्यालयामध्ये प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षीही स्व.नाना पालकर स्मृती राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन मंगळवार, दिनांक ११ ऑक्टोबर २०२२ रोजी करण्यात आले होते. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ हे खोलेश्वर महाविद्यालयाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष होते. सुवर्णमहोत्सवी वर्षापासून ही स्पर्धा राज्यस्तरीय स्वरूपात साजरी केली जात आहे. वर्ष २०२२-२३ हे मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. राष्ट्र, पर्यावरण, समाज आणि शिक्षण या चतुःसूञीला अनुसरून ही वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्यामुळे या स्पर्धेला एक आगळे – वेगळे महत्त्व प्राप्त झाले होते.खोलेश्वर महाविद्यालय हे मागील ५१ वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात विविध सामाजिक, शैक्षणिक गुणवत्तेच्या वाढीसाठी सकारात्मक परीवर्तन करण्यासाठी प्रयत्नशिल आहे. यावर्षी ही या स्पर्धेत राज्याच्या विविध विभागातून तब्बल २४ स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्व.नाना पालकर स्मृती आंतर महाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे विषय पुढीलप्रमाणे होते. – १) मराठवाडा विकास – सामाजिक व आर्थिक आव्हाने, २) भारतीय कुटुंब व्यवस्था – एक संस्कार केंद्र, ३) स्वागत नविन शैक्षणिक धोरणाचे, ४) देणा-याने देत जावे असे होते. आपला विषय मांडण्यासाठी प्रत्येक स्पर्धक विद्यार्थ्यांस ७ मिनिटांचा अवधी देण्यात आला होता. स्पर्धेचे माध्यम मराठी होते, स्पर्धेच्या पारितोषिकांचे स्वरूप स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व रोख रक्कम असे होते. या स्पर्धेत महाराष्ट्रातून औरंगाबाद, बीड, माजलगाव, केज, नांदेड, अहमदनगर, लातूर, वडवणी, अंबाजोगाई आणि घाटनांदुर आदी भागातील स्पर्धक सहभागी झाले होते. सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले. स्पर्धेचे उद्घाटन शंतनू हिरळकर यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानी भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुरेंद्र आलुरकर हे ऑनलाईन सहभागी झाले होते. या प्रसंगी व्यासपीठावर विजयराव वालवडकर, आप्पाराव यादव, राम कुलकर्णी,सौ.वर्षाताई मुंडे, प्राचार्य डॉ.मुकूंद देवर्षी, स्पर्धा प्रमुख प्रा.डॉ.दिगंबर मुडेगावकर, सहप्रमुख प्रा.शाम बारडकर, सौ.लताताई पत्की (निळकरी) आणि परीक्षक म्हणून सौ.किर्ती मुळे, दत्ता घुगे, प्रा.डॉ.गणेश मुडेगावकर यांची उपस्थिती होती. उद्घाटन सत्रात दीपप्रज्ज्वलन, प्रतिमापूजन करण्यात आले. प्रास्ताविक करताना स्पर्धा प्रमुख प्रा.डॉ.दिगंबर मुडेगावकर यांनी भारतीय शिक्षण प्रसारक संस्था ही उत्तम चारित्र्यवान नागरिक घडविते, संस्थेत सतत ५२ वर्षांपासून ही स्पर्धा अखंडितपणे सुरू आहे.स्व.नाना हे प्रतिभावंत कवी आणि लेखक होते. नानांचे कार्य खूप मोठे आहे. आजच्या तरूणांनी त्यांच्या लिखाणातून प्रेरणा घ्यावी. राष्ट्रप्रेमी नागरिक घडावेत, वर्तमान स्थिती आणि भविष्याचा वेध घेणारे विषय स्पर्धेत ठेवले असल्याचे स्पर्धा प्रमुख प्रा.डॉ.मुडेगावकर यांनी सांगितले. या प्रसंगी राम कुलकर्णी, विजयराव वालवडकर यांनी समायोचित संवाद साधला. उद्घाटन सत्रात बोलताना शंतनू हिरळकर यांनी सतत ५२ वर्षांपासून ही स्पर्धा अखंडितपणे सुरू असणे हि अभिमानास्पद बाब आहे तसेच स्पर्धेतील सातत्य हि महत्वाची गोष्ट असून वक्त्याने बोलणे म्हणजे तो भाषेचा गौरव असतो असे सांगितले. अध्यक्षीय समारोप करताना संस्थेेचे अध्यक्ष डॉ.सुरेंद्रजी आलुरकर यांनी संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या आशा, आकांक्षा, इच्छा पूर्ण करण्याचे कार्य केले जाते. स्व.नानांनी आपल्या एकोणपन्नास वर्षांच्या जीवनात खूप मोठे योगदान दिले. वक्तृत्व हा आपल्या शिक्षणाचा भाग आहे. आपल्याला व्यक्त होता येणे, प्रभावी सादरीकरण करणे ही खूप मोठी कला आहे. वक्तृत्वामुळे मुलांच्या कल्पनाशक्तीला धुमारे फुटतात, नवीन आयाम जोडले जातात. नानांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य समाजासाठी वेचले. वक्तृत्वाचा हा यज्ञ मागील ५२ वर्षांपासून चालू आहे. त्यातून आपल्या समर्पित भावाची फलनि:ष्पत्ती आपणांस मिळाल्यावाचून राहणार नाही. स्पर्धकांचे जीवन नानांच्या जीवनाप्रमाणे फुलावे अशी अपेक्षा डॉ.आलुरकर यांनी व्यक्त केली. उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन प्रा.सतीश हिवरेकर यांनी केले. प्रा.शैलेश पुराणिक यांनी शांतीमंत्र पठण केले तर उपस्थितांचे आभार प्रा.योगेश कुलकर्णी यांनी मानले. स्पर्धेच्या समारोप सत्राच्या अध्यक्षस्थानी भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यवाह डॉ.हेमंत वैद्य तर प्रमुख अतिथी म्हणून भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे प्रशासकीय अधिकारी प्रा.चंद्रकांत मुळे, खोलेश्वर शैक्षणिक संकुलाचे कार्यवाह बिपीनदादा क्षीरसागर, शहर संघचालक दत्तप्रसाद रांदड, आप्पाराव यादव, पत्रकार प्रशांत बर्दापूरकर, प्राचार्य डॉ.मुकूंद देवर्षी, प्रा.डॉ.दिगंबर मुडेगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती. समारोप सत्रात खोलेश्वर माजी विद्यार्थी संघाच्या वतीने २ अद्ययावत संगणक संच खरेदीसाठी नव्वद हजार रूपयांचा धनादेश प्रशांत बर्दापूरकर, महेश सेलूकर, डॉ.मुकूंद देवर्षी, डॉ.बिभिषण फड, डॉ.गणेश मुडेगावकर, दत्ता घुगे, गणेश दायमा, प्रा.सतीश हिवरेकर यांच्याकडून भेट स्वरूपात देण्यात आला. तसेच मान्यवरांकडून वाणिज्य विभागाच्या वतीने आयोजित “पोस्टर प्रेझेंटेशन” स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. याप्रसंगी प्राचार्य डॉ.मुकूंद देवर्षी यांनी आपल्या प्रास्ताविकातून राज्यस्तरीय स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे असे सांगून स्पर्धेसाठी मदत व सहकार्य करणार्या सर्वांचे त्यांनी आभार मानले. या प्रसंगी परिक्षकांच्या वतीने प्रा.डॉ.गणेश मुडेगावकर, दत्ता घुगे यांनी तर स्पर्धक पायल गिल्डा, आदित्य दराडे यांनी मनोगत व्यक्त केले. स्पर्धा प्रमुख प्रा.डॉ.दिगंबर मुडेगावकर यांनी स्पर्धेचा आढावा घेतला. बिपीनदादा क्षीरसागर यांनी स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास साधला जातो. स्पर्धेला राज्यभरातून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे असे सांगून यामुळे स्पर्धेचा आलेख उंचावत असल्याचे नमूद केले. त्यांनी स्व.नानांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकून विद्यार्थ्यांनी त्यांचे चरित्र अभ्यासले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रा.चंद्रकांत मुळे यांनी सहभागी स्पर्धकांना विस्तृत मार्गदर्शन करताना स्व.नाना हे देशसेवेसाठी समर्पित व्यक्तिमत्व होते, भाशिप्र संस्था ही सामाजिक बांधिलकीतून कार्य करते असे सांगून प्रा.मुळे यांनी विजेत्या स्पर्धकांचे कौतुक करून अभिनंदन केले. या स्पर्धेच्या माध्यमातून उत्तम व्यक्ती आणि वक्ते घडतात, विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना चालना मिळते असे नमुद करून कोरोना काळातही महाविद्यालयाने हि स्पर्धा यशस्वीपणे घेतल्याचे कौतूक संस्थेेचे कार्यवाह डॉ.हेमंत वैद्य यांनी केले. त्यांनी सर्व यशस्वी स्पर्धकांचे अभिनंदन केले. समारोप सत्राचे सुत्रसंचालन प्रा.प्रसन्ना जोशी यांनी, तर पारितोषिक वितरण प्रसंगी स्पर्धेचे निकाल वाचन प्रा.विनय राजगुरू यांनी केले. उपस्थित मान्यवर आणि सहभागी स्पर्धकांचे आभार प्रा.डॉ.रविंद्र कुंबेफळकर यांनी मानले. प्रा.शैलेष पुराणिक यांनी वैयक्तिक पद्य सादर केले. शांतीमंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली. स्व.नाना पालकर स्मृती आंतर महाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे विजेते पुढीलप्रमाणे आहेत. श्रीमती कुमुदिनी पांडे यांच्या स्मरणार्थ शिरीष पांडे यांच्या तर्फे वैयक्तिक पारितोषिक – १) प्रथम क्रमांक – कु.अन्वी विकास जाधव, सिध्देश्वर कनिष्ठ महाविद्यालय, माजलगाव (रोख रक्कम ५५०१/-, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र), सौ.लताताई पत्की यांच्या वतीने वैयक्तिक पारितोषिक – २) द्वितीय क्रमांक – चि.महेश जनार्धन उशीर, न्यु आर्ट्स, सायन्स, काॅमर्स काॅलेज, अहमदनगर ( रोख रक्कम ३५०१/-, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र), ऋषिकेश कलेक्शन यांच्या वतीने वैयक्तिक पारितोषिक – ३) तृतीय क्रमांक – रामदास रमेश शिंदे, खोलेश्वर वरीष्ठ महाविद्यालय, अंबाजोगाई (रोख रक्कम २५०१/- , सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र) तसेच ४) नंदकुमार सेलूकर यांच्या स्मरणार्थ उत्तेजनार्थ पहिले पारीतोषिक – चि.प्रविण सुभाषराव काजळे, न्यु आर्ट्स, सायन्स, काॅमर्स काॅलेज, अहमदनगर (रोख रक्कम ११००/-, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र.) आणि प्रा.सौ.अनुपमा जाधव यांच्या तर्फे उत्तेजनार्थ दुसरे पारीतोषिक – ५) कु.साक्षी श्रीनिवास येवले, सिध्देश्वर कनिष्ठ महाविद्यालय, माजलगाव (रोख रक्कम ११००/-, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र.) तर फिरता सांघिक चषक – सिध्देश्वर कनिष्ठ महाविद्यालय, माजलगाव या संघाला प्राप्त झाला. स्पर्धेसाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. स्पर्धा यशस्वितेसाठी संयोजन समितीतील सर्व प्राध्यापक यांनी पुढाकार घेतला.