आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्यास एसएफआय, विद्यार्थी आणि पालकांमध्ये तीव्र विरोध

मुख्यमंत्र्यांना पाठवले तहसीलदारांमार्फत निवेदन

विद्यार्थी संघटना, पालक व शिक्षणप्रेमी नागरिकात शिंदे फडणवीस सरकार विरोधात तीव्र संताप

वडवणी :-(प्रतिनिधी)

राज्यातील सरकारी शाळा बंद करण्याच्या निर्णयाचा स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) विद्यार्थी, पालक आणि शिक्षणप्रेमींकडून तीव्र विरोध होत असून शिंदे फडणवीस सरकार विरोधात संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहेत. हा निर्णय तात्काळ रद्द करण्याच्या मागणी निवेदन वडवणी तहसीलचे तहसीलदार यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एसएफआय, विद्यार्थी आणि पालकांनी पाठवले आहे. सार्वत्रिक शिक्षणासाठी महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी प्रचंड मोठे कार्य केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेतून सर्वांना शैक्षणिक क्षेत्रात जाण्यासाठी न्याय दिला. अशा महामानवांच्या पुरोगामी राज्यात आज सरकारी शाळा बंद करणे हे अत्यंत चुकीचे असून याचा एसएफआय तीव्र विरोध करते.

राज्यात मागील काही दिवसांपासून शाळा बंद करण्याच्या हालचाली सुरु झालेल्या आहेत. कमी पटसंख्या हे कारण पुढे करून ग्रामीण आणि दुर्गम भागातील मराठी शाळा बंद केल्या जात आहेत. यामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा अधिक आहेत. शाळा बंद करण्याचा निर्णय हा ग्रामीण आणि दुर्गम भागातील मागास विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारे बंद करण्याचा एक भाग आहे. त्यातून विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण घेतानाच बाहेर फेकले जाईल; मुलींसाठी शिक्षण कायमचे दूर जाईल, असे अनेक धोके निर्माण होतील. एकीकडे शिक्षण हक्क कायदा सक्तीचे आणि मोफत शिक्षण देण्याची हमी देते. तेंव्हा शिक्षण देणे ही सरकारची जबाबदारी आहे. अशा वेळी ते कर्तव्य पार पाडणे हे सरकारचे काम आहे. परंतु सरकार मात्र याच्या उलट दिशेने चालले आहे. शाळेत विद्यार्थी संख्या नाहीये हे कारण सांगणे काही उचित नाही. पटसंख्या कमी असणे हा प्रशासनाचा दोष आहे, त्यात तेथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा दोष नाही. म्हणून समाजातील शेवटच्या घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये टिकवून ठेवण्यासाठी, राज्यातील सरकारी मराठी शाळा बंद करणे त्वरित थांबवून त्या अधिक सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने ठोस पावले उचलावीत. अशी मागणी एसएफआयने केली आहे. यावेळी एसएफआयचे जिल्हा सचिव लहू खारगे, विजय आडागळे, गणेश टकले, कैलास कसबे, शंकर झाडे, सिद्धेश्वर पाटोळे, एड. ऋषिकेश उजगरे, विलास थोरात, श्री देशमुख, ज्योतीराम कलेढोण, आत्माराम माने, भीमराव लोखंडे आदी विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.