छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जातीधर्माच्या लोकांना सन्मानाची वागणूक दिली – इतिहास संशोधक डॉ.साहेबराव गाठाळ

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
येथील ज्येष्ठ नागरिक संघाची मासिक बैठक नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना प्रा.डॉ.साहेबराव गाठाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जातीधर्माच्या लोकांना सन्मानाने वागणूक दिली असे सांगून “छत्रपती शिवाजी महाराजांच्या यशस्वी राज्यकारभारा मागचे रहस्य काय..?” या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.
सर्वप्रथम ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने प्रमुख मार्गदर्शक इतिहास संशोधक प्रा.डॉ.साहेबराव गाठाळ यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार देऊन हृद्य सन्मान करण्यात आला. विचारमंचावर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पुंडलिक पवार, कार्याध्यक्ष एॅड.अनंतराव जगतकर, ज्येष्ठ पत्रकार सुदर्शन रापतवार, चंद्रशेखर वडमारे, प्रा.पंडीत कराड, डॉ.सुरेश अरसुडे, सुभाष बाहेती, डॉ.दामोदर थोरात, सौ.कमलताई बरूळे, सचिव मनोहरराव कदम, धनराज (बापू) मोरे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. जगदीश जाजू यांनी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पुंडलिक पवार यांचे स्वागत केले. तर या प्रसंगी डॉ.डी.एच.थोरात यांनी उपस्थितांना इतिहास संशोधक डॉ.साहेबराव गाठाळ यांचा कार्य परीचय करून दिला. या प्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ.साहेबराव गाठाळ म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्त्रियांच्या संरक्षणाला प्रथम प्राधान्य दिले, स्वराज्यात स्त्रियांचा छळ करणारांचे हातपाय तोडण्याची कठोर शिक्षा दिली जात होती, महाराजांनी ‘गनिमी कावा’ ही शिवनीती वापरून शत्रूंशी यशस्वी लढा दिला, महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात महत्त्वाच्या पदावर मुस्लिम समाजाचा शिलेदार मावळा होता, एवढेच नाही तर त्यांचे अंगरक्षक म्हणून १६ मुस्लिम अधिकारी होते, महाराजांनी नेहमीच शेतकरी, कष्टकरी, बारा बलुतेदार, आठरा आलूतेदार, गोरगरीब प्रजेला न्याय दिला, महाराजांच्या राजवटीत एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही याची नोंद अनेक इतिहासकारांनी घेतली आहे, महाराजांनी अनेक किल्ले जिंकून घेतले, महाराज सर्वच जातीधर्माच्या समाजबांधवांना सन्मानाने वागवीत असत, स्वराज्याच्या मार्गात आडकाठी आणणारांची त्यांनी कधीही गय केली नाही, कल्याणच्या मुस्लिम सुभेदाराच्या सुनेचे महाराजांनी रक्षणच केले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात सर्व जनता सुखी व समाधानी होती, महाराजांनी जात, धर्म, भाषा, प्रांत, पंथ असा भेदभाव कधीही केला नाही, महाराज हे सर्वधर्मीयांच्या मनावर राज्य करणारे लोकल्याणकारी राजे होते म्हणूनच शेकडो वर्षांनंतर आज ही आपण सर्वजण मिळून महाराजांची जयंती उत्साहात साजरी करीत आहोत, वंदनीय महाराजांच्या लोककार्याला आपण सर्वांनी वंदन नेहमीच केले पाहिजे असे सांगून डॉ.गाठाळ म्हणाले की, यापुढे आपण सर्वांनी मिळून मोठ्या प्रमाणात छत्रपती शिवाजी महाराजांची चरित्रात्मक पुस्तके प्रकाशित करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, तसेच नव्या पिढीला सदैव प्रेरणा मिळावी यासाठी शालेय, महाविद्यालयीन अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या संपूर्ण प्रेरक इतिहासाचा समावेश करावा, अशी अपेक्षा ही डॉ.गाठाळ यांनी यावेळी व्यक्त केली. या प्रसंगी धनराज मोरे यांनी ज्येष्ठ नागरिक संघाच्या आगामी २०२३ – २०२७ च्या निवडणूक कार्यप्रणाली विषयीची माहिती सर्व सभासदांना दिली. ज्येष्ठ नागरिक संघाने नियुक्त केलेले निवडणूक निर्णय अधिकारी भास्करराव हरेगावकर यांचाही मान्यवरांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य श्रीरंग (आबा) चौधरी यांनी वाढदिवसानिमित्त इंदूताई पोटपल्लेवार, मनोहरराव कदम, मंगलताई भुसा, सरस्वतीताई फड, वाडेकर ताई व इतरांचे अभिष्टचिंतन करून पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. याकामी त्यांना पुरूषोत्तम वाघ यांनी सहकार्य केले, अध्यक्षीय समारोप ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पुंडलिक पवार यांनी केला. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार सचिव मनोहरराव कदम यांनी मानले. या प्रसंगी एकूण ७० जेष्ठ नागरिक स्त्री – पुरूष उपस्थित होते,
================