
वैभवशाली महाराष्ट्र न्यूज विशेष
प्रतिनिधी पर्यावरण विशेष
———————————-
वेळ सायंकाळची….पाचचा सुमार ….सहज घराबाहेर पडलो आणि माझ्या बालपणीची आठवण करवून देणारं दृश्य मला दिसलं.पाच-पंचवीस किशोरवयीन पोरांच टोळकं. लहान मुलंही त्यात सामील. समोरच्या पोराच्या गळ्यामध्ये हलगी लावलेली आणि अजुन एकदोघांच्या हातात रिकामे पोते स्वारी नुकतीच निघालेली. आता ही टोळी म्हणजे होळी साजरा करण्यासाठी लागणार्या गोवर्या गोळा करण्यास निघालेली सुशिक्षीत अज्ञानी टोळी हे उमगण्यास मला क्षणाचाही विलंब लागला नाही आणि सामाजिक प्रश्नाप्रती माझ्यामध्ये असलेल्या तळमळीनं-विचारानं मला अधिकच उव्दिग्न बनवलं आणि माझा आजचा लेख तसातर सर्वांसाठी तथापि अधिकांश या टोळीसाठीच ……!
“करण्या साजरी होळी
निघाली ही खास टोळी
मागत कुणब्यास गोवरी
हिंडती शेत – शिवारी…!”
सणांनी नटलेली ही आपली संस्कृती त्यात होळी – रंगपंचमी हा तसा अधिकच उत्साहाचा उत्सव. गल्लोगल्ली दुकानंच्या दुकानं भरली आहेत. रसायनयुक्त रंग आणि पिचकार्यांनी होळी म्हटलं की लाखो टन लाकडे, गोवर्यांच इंंधन नक्कीच नाश पावणार यांच्या या अज्ञानापोटी. काय आहे होळीची प्रथा इंधनाचा नाश करणं ……..? आपल्याच बांधवांना अर्वाच्च भाषेत अपशब्द वापरून, बोंब मारून इतरांना त्रास होईल असं वागणं…. ? वाटतं का योग्य ? हीच का ती तुमची होळी ? वर्षानुवर्षे चालत आलेल्या या अज्ञानरूपी अंध:काराला तुम्ही असंच पसरू देणार का?अहो ही तर तुमच्या मनात घर करून बसलेली अंधविचारी होळी आहे. तसं तर संस्कृती आणि शास्त्र यांचा अगदी निकटचा संबंध आणि जगन्मान्य या शास्त्राचं असं सांगणं आहे की आपल्या परिसरातील केरकचरा गोळा करून जाळणं आणि आपला परिसर स्वच्छ ठेवणं. आता त्या केरामध्ये तुमच्या मनातील होळी, जळमट, अंधश्रध्दा, विध्वंसक आनंदासाठी केलेलं कृत्य आणि तुमचं अज्ञान हे एकदा त्या निखार्यामध्ये टाका म्हणजे नक्कीच ही विध्वंसक होळी अस्तास जाईल आणि त्यातुन प्रसारित होणारा प्रकाश आणि ज्वाला या आपल्याला विधायक, प्रगती आणि सद्विचारांच्या भडका उठविणार्या असुन जीवनात कायमस्वरूपी आनंद आणि आनंदच देणार्या मिळतील.अगदी याचसोबत अवघ्या काही तासांनीच विविध रंगी रसायनाने माखलेले तुमचे चेहरे…. तुमच्या चेहर्यावरील तात्पुरता आणि विध्वंसक मार्गाने मिळवलेला आनंद (?) खरंच मिळतो का हो आनंद त्या तात्पुरत्या झिंगेने..? कर्कश बोंब मारल्यानेे..? रसायन चेहर्याला (अगदी मनालासुध्दा) फासल्यामुळे ..? दुर्मिळ होत असलेल्या इंधन, पाणी आणि पैसा यांची अनावश्यक नासाडी केल्यामुळे..? पाहताय ना तुम्ही – पैसा आणि पाणी या दोन गोष्टीमुळे हवालदिल झालेला त्रस्त झालेला बळीराजा आणि तुम्ही आम्हीसुद्धा ! मग विचार करा की खरंच याची गरज आहे का? पिढ्यानं – पिढ्या चालत असलेलं आणि अगदी सुशिक्षितांच्या सुध्दा डोळ्यात असलेला हा अंधार आणि अज्ञान या होळीमध्ये दहन करण्याची गरज मला प्रकर्षानं वाटते.होळी आणि रंगपंचमीचे तीन दिवस आपल्याही नकळत येतात आणि निघून जातात मात्र आपल्या डोक्यातलं हे वर्षानुर्ष चालत आलेलं अनावश्यक असलेलं खूळ घालवणं ही काळाची गरज आहे हे ज्या क्षणी वाटलं अगदी त्याच क्षणापासून म्हणजे आजपासुन पंधरा वर्षापुर्वी फटाकेमुक्त दिवाळी व कलरमुक्त होळी हे संयुक्त अभियान मी नेताजी सुभाषचंंद्र (मा.) विद्यालयाच्या माध्यमातून राबवत आलेला आहे. आणि आजच्या घडीला ही गरज आहे तुमची – आमची सर्वांची , पर्यायाने समाजाला आणि आपल्या देशाला विकासाच्या टप्प्यावर नेण्यासाठीची.
होळी करावी साजरी अगदी रंगपंचमीसुध्दा ! परंतु त्यात जो बदल करावा वाटतो आपल्या आनंद आणि विकासासाठी तो हाच ! उगाच विनाकारण रंगपंचमीसाठी लाखो लिटर पाणी, रंगांसाठी भरमसाठ पैसा आणि होळीसाठी लाखो टन इंधन नष्ट करणे नक्कीच उचित नाही. करावा आनंद साजरा रंगपंचमीमध्ये त्याबद्दल दुमत नाही ; परंतु रंग वापरताना नैसर्गीक रंग वापरले, कोरडे रंग वापरले तसेच फुलांपासून तयार होणारे रंग वापरले तर त्यापासून आपल्या शरीरालाही काही हानी होणार नाही, विनाकारण खर्च होणारे पैसेही वाचतील आणि त्यातून खरा आनंद ज्याला म्हणावं तोही कितीतरी पट अधिकच मिळेल, मअगदी शाश्वत टिकणारा…!
अजुन याच्याही पलीकडं जाऊन सांगतो, खरं समाधान, खरं सुख ज्याला म्हणतात जे कधी लाखो-करोडो ओतुनही भेटत नाही त्याचीच अनुभूती तुम्हाला घ्यायची असेल तर जो पैसा तुम्ही रासायनिक रंगामध्ये खर्च करणार होतात तोच पैसा तुम्ही महामानवाच्या जीवनावरील पुस्तकांची देवाण-घेवाण करण्यासाठी वापरा. मस्तकात पुस्तक गेलं तर मन, मनगट, मस्तक मजबूत होईल. कारण वाचाल तर टिकाल नाही तर भंगारामध्ये फेकाल. त्याच खर्चातून गरजूंना मदत करा आणि त्यांच्या चेहर्यावर झळकणारा आनंद आणि समाधान पहा… नक्कीच ते लाखमोलाचं असेल यात काही शंकाच नाही. त्याचप्रमाणे जी शक्ती तुम्ही व्यर्थ बोंब मारण्यामध्ये, नैतिकतेच्या र्हासामध्ये खर्च करण्यामध्ये, त्यातुन उद्भवणार्या वादामुळे आपलीच माणसे आपल्यापासुन दुरावण्यामध्ये व्यर्थ घालवणार होतात तीच शक्ती जर संस्कार संपन्न बोलण्यासाठी वापरली तर नक्कीच चार माणसं तुमच्याशी जोडली जातील, त्यातुन सामाजिक एकोपा वाढेल,तुम्ही चांगलं बोलल्यामुळे तुमचे दोन शब्द आणि समोरच्याचे दोन शब्द असे मिळून चार शब्द नक्कीच तुमच्या उन्नतीला पुरक ठरतील आणि पर्यायानं तुमचीच नव्हे तर समाजाची आणि देशाची प्रगतीसुध्दा होईल.यात काही शंकाच नाही.आजच्या होळी उत्सवादिवशी आपण सर्वजण मनातील जळमट या केरासोबत जळत असताना शपथ घेऊयात,
आम्ही सर्वजण आजीवन निर्व्यसनी राहु, पुस्तके वाचु, आई – वडील, माता – भगिनी यांचा सन्मान करू, ही छत्रपती शिवरायांची शिकवण मनी धरू आणि सामाजिक सलोखा निर्माण करू.तर मग करायचीय ना आपल्याला रंगमुक्त होळी आणि भरायचेत ना विविध विधायक रंग आपल्या आयुष्यात..? करायचीय सुरूवात तर मग अगदी स्वत:पासूनच ! आपण एक सुजाण नागरिक या अनिष्ट प्रथेला आपल्याच घरात खतपाणी तर घालत नाहीत ना?- हे आजच्या दिवशी जरूर तपासा आणि विचारांनी सिध्द होऊन विधायक कार्याचे रंग जर तुम्ही आपल्या आयुष्यात भरले तर जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला उन्नतीपासुन रोखू शकणार नाही हे तर नक्कीच…! तुमच्या या कार्यासाठी माझ्या तुम्हाला मनापासुन हार्दिक आणि उदंड शुभेच्छा !
लेखक-श्री.रामकिसन गुंडीबा मस्के (सर)
(लेखक नेताजी सुभाषचंद्र (मा.) विद्यालय येथे शिक्षक आहेत)