आशिष लोमटेचे नेत्रदीपक यश ; एमबीबीएस होण्याचा मिळवला बहुमान
यशस्वी गुणवंत सन्मान

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज विशेष
=======================
अंबाजोगाई (वार्ताहर)
इच्छाशक्ती व प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची तयारी असेल तर जगात कोणतीच गोष्ट अशक्य नाही. याची प्रचिती म्हणजे येथील गुणवंत विद्यार्थी डॉ.आशिष अनिता बालासाहेब लोमटे हा होय. एमबीबीएस ही वैद्यकीय क्षेत्रातील पदवी प्राप्त करून त्याने कुटुंबाचे नांव उंचावले आहे.
एमबीबीएस – २०१८ च्या बॅचचा दिक्षांत समारंभ नुकताच अंबाजोगाई येथे आर्यवीर लॉन्स, केज रोड येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने (मुंबई) आणि डॉ.अश्विनीकुमार तुपकिरे (संचालक, हेडगेवार हॉस्पिटल, छत्रपती संभाजीनगर.) हे होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वामी रामानंद तीर्थ शासकीय ग्रामीण रूग्णालय व महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ.शंकर धपाटे हे होते. यावेळी उपअधिष्ठाता डॉ.अरविंद बगाटे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. या दिक्षांत समारंभात डॉ.अश्विनीकुमार तुपकिरे यांच्या हस्ते आणि सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ.प्रकाश चव्हाण (नांदेड), सुप्रसिद्ध ह्रदयरोग तज्ज्ञ डॉ.दिपक कटारे (अंबाजोगाई) यांच्यासह मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ.आशिष अनिता बालासाहेब लोमटे याने एमबीबीएस ही वैद्यकीय क्षेत्रातील पदवी स्विकारली. हा अभ्यासक्रम साडे पाच वर्ष कालावधीचा आहे. त्यानंतर इंटर्नशिप एक वर्ष असते. आशिष हा अंबाजोगाई येथील तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.बालासाहेब लोमटे यांचा मुलगा आहे. यापूर्वी डॉ.आशिषची बहिण डॉ.ऐश्वर्या हिने ही एमबीबीएस ही वैद्यकीय क्षेत्रातील पदवी प्राप्त केली आहे. आशिषला उपअधिष्ठाता डॉ.सिध्देश्वर बिराजदार, अधिक्षक डॉ.राकेश जाधव यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले आहे. डॉ.आशिषचे प्राथमिक शिक्षण हे दुर्गम आदिवासी भागात होली क्रॉस शाळा, चिखलदरा (जि.अमरावती) येथे तर माध्यमिक शिक्षण योगेश्वरी नूतन विद्यालय, अंबाजोगाई येथे झाले आहे. तसेच बारावीचे शिक्षण छत्रपती राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर येथे झाले. स्वामी रामानंद तिर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई येथून त्याने एमबीबीएस ही पदवी घेतली आहे. आता स्त्रीरोग तज्ज्ञ या विषयात अश्विनी वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर येथे पुढील उच्चशिक्षण घेत आहे. डॉ.आशिषने सुरूवाती पासूनच वाचन व खेळ हे छंद जोपासले आहेत. एमबीबीएस होण्याचा बहुमान प्राप्त केल्याबद्दल लोमटे परिवार, विविध क्षेत्रातील मान्यवर, नातेवाईक, मित्र, पत्रकार यांच्याकडून डॉ.आशिषचे कौतुक होत आहे.
*गोरगरीब, गरजू समाज बांधवांची रूग्णसेवा करणार :*
माझ्या यशात माझे आई – वडील, बहिण व प्राथमिक शाळेपासून आतापर्यंतच्या सर्व गुरूजनांचे मोठे योगदान आहे. वडील डॉ.बालासाहेब लोमटे हे तालुका आरोग्य अधिकारी म्हणून अंबाजोगाई येथे कार्यरत आहेत. तर आई सौ.अनिता यांनी घरकाम सांभाळत माझ्या अभ्यासाकडे काळजीपूर्वक लक्ष दिले. बालमित्र सुजित रामराव दिक्षित याचे ही सहकार्य लाभले. यापुढे गोरगरीब, गरजू समाज बांधवांची रूग्णसेवा करण्याचा माझा मानस आहे. समाजबांधवांना शिक्षणाचे महत्व पटवून देण्यासाठी मी कटिबद्ध असणार आहे.
*- डॉ.आशिष लोमटे (अंबाजोगाई)*