प्रलंबित जात पडताळणी प्रस्ताव तत्काळ मार्गी लावा नसता तीव्र आंदोलन छेडू – गणेश बजगुडे पाटील

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
बीड / जात पडताळणी प्रमाणपत्र देण्यासाठी जाणीवपुर्वक उशिर केला जात असल्याचा आरोप करत आज बीड तालुका काँग्रेस कमिटी व शिवक्रांती संघटनेच्या वतीने गणेश बजगुडे पाटील यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी बीड यांची भेट घेत निवेदन देण्यात आले.
यावेळी गणेश बजगुडे पाटील म्हणाले की, जात पडताळणी प्रस्ताव दाखल केल्यापासुन जास्तीत जास्त एक महिन्याच्या आत निकाली काढून संबंधितांना प्रमाणपत्र दिले पाहिजे परंतु याठिकाणी जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात आहे. सध्या विद्यार्थ्यांचा ऍडमिशन कालावधी सुरु असुन जात पडताळणी प्रमाणपत्र न मिळाल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान होवु शकते. विशेषतः अनेक महिने उलटुन देखील काही विद्यार्थी पालक वारंवार चकरा मारत आहेत त्यांना समाधान कारक उत्तर दिले जात नाही. विशेषतः SEBC व कुणबी (ओबीसी) प्रमाणपत्र देण्यासाठी उशीर होत असल्याचे निदर्शनास येत आहे तरी आपण स्वतः याकडे लक्ष देवुन एक महिन्याच्या आत जात पडताळणी प्रमाणपत्र देण्याचे आदेश द्यावेत व मागील प्रलंबित सर्व प्रकरणे तत्काळ निकाली काढावीत नसता बीड तालुका काँग्रेस कमिटी व शिवक्रांती विद्यार्थी परिषदेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे शिवक्रांती संघटनेचे अध्यक्ष तथा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश बजगुडे पाटील यांनी दिला. यावेळी इंटक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रामधन जमाले, जिल्हा सचिव सखाराम बेडगे, तालुका सचिव शेख अर्शद, शिवक्रांती विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष ओमकार पाटील, सुदर्शन शिंदे आदी उपस्थित होते.