समर्पित व्यक्तीमत्वांचा सन्मान करणारे कर्मयोगी डॉ.बालासाहेब ठोंबरे पाटील स्मृती प्रतिष्ठाण – आमदार नमिताताई मुंदडा
कर्मयोगी डॉ.बालासाहेब ठोंबरे पाटील स्मृती प्रतिष्ठाणच्या राज्यस्तरीय पुरस्कारांचे उंदरी येथे वितरण

सामाजिक विशेष..
ठोंबरे कुटुंबाने बंधूभाव जोपासला – रमेशराव आडसकर
केज (प्रतिनिधी)
कर्मयोगी डॉ.बालासाहेब ठोंबरे पाटील यांच्या दहाव्या पुण्यस्मरणानिमित्त स्मृती प्रतिष्ठाणच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुरस्कारांचे वितरण सोमवार, दिनांक २६ मे रोजी केज तालुक्यातील उंदरी येथे करण्यात आले. या निमित्ताने मान्यवरांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा आणि पूर्वसंध्येला ‘खरीप पिक परिसंवाद व आत्मभान जागृती कार्यक्रम’ ही आयोजित करण्यात आला होता.
कर्मयोगी डॉ.बालासाहेब ठोंबरे पाटील स्मृती प्रतिष्ठाणच्या वतीने दिवंगत सहयोगी अधिष्ठाता व विद्यार्थीप्रिय प्राचार्य कर्मयोगी डॉ.बालासाहेब ठोंबरे पाटील यांच्या दहाव्या पुण्यस्मरणानिमित्त सोमवार, दिनांक २६ मे रोजी सकाळी वृक्ष पुजन व संवर्धन करण्यात येवून नियोजित कार्यक्रमास सुरूवात झाली. उंदरी (ता.केज) येथील श्री विठ्ठल – रूक्मिणी मंदिरात पुरस्कार वितरण व शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याचे उद्घाटन अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन रमेशराव आडसकर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ.नमिताताई मुंदडा या होत्या. यावेळी विचारमंचावर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.नागोराव पवार (माजी संचालक, विस्तार शिक्षण, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी), डॉ.दिगंबरराव चव्हाण (माजी कुलसचिव, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी) या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली. प्रारंभी मान्यवरांनी दीपप्रज्ज्वलन आणि प्रतिमापूजन केले. त्यानंतर स्मृती प्रतिष्ठाणकडून मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रतिष्ठानच्या कार्याचा विस्तृत आढावा घेऊन, समाजाचे आपण काही देणे लागतो. या भावनेतून हा कार्यक्रम घेण्यामागे तरूण पिढीला दिशा व प्रेरणा मिळावी हा विधायक हेतू आहे. नातेबंध, सुसंस्कार वृद्धींगत करून संवेदनशील व परिवर्तनशील समाज निर्मितीसाठी हा उपक्रम मागील दहा वर्षांपासून आयोजित करीत आहोत असे सौ.अनुराधा सुर्यवंशी-ठोंबरे (लातूर) यांनी नमूद केले. यावेळी उद्घाटक म्हणून बोलताना रमेशराव आडसकर यांनी सांगितले की, ठोंबरे आणि आडसकर परिवाराचा जुना स्नेहबंध आहे. आई-वडिलांची सेवा करणारे, सेवाभाव जोपासणारे, माणुसकी जीवंत ठेवणाऱ्या. एकत्र कुटुंब पद्धतीचा आदर्श टिकवून ठेवणाऱ्या, सेंद्रिय शेतीतील कार्य व प्रयोगशील शेतकरी बांधवांना प्रेरणा व बळ देणारे, पत्रकारिता, संगीत, शिक्षण, समाजसेवा, आरोग्य, कृषी, साहित्य, सहकार, विधी, प्रशासन, उद्योग, व्यवसाय तसेच राष्ट्रीय एकात्मता व सामाजिक बांधिलकी जोपासून विविध क्षेत्रात निस्वार्थपणे व समर्पित भावनेतून कार्य करणाऱ्या आदर्श व्यक्तिमत्वांचा ठोंबरे कुटुंबिय दरवर्षी पुरस्कार देऊन सन्मानित करते हे अभिनंदनीय कार्य आहे. हा पुरस्कार सोहळा महाराष्ट्रात बीड जिल्ह्याचा नांवलौकिक वाढविणारा आहे असे गौरवोद्गार आडसकर यांनी काढले. तर अध्यक्षीय समारोप करताना आमदार सौ.नमिता अक्षय मुंदडा यांनी सांगितले की, हे प्रतिष्ठान चांगले उपक्रम राबवून कर्मयोगी डॉ.बालासाहेब ठोंबरे यांचे समर्पित कार्य व संस्काररूपी विचार पुढे नेत आहे. महाराष्ट्रातील विविध भागांत व विविध क्षेत्रातील मान्यवरांचा आज येथे सन्मान होत आहे. हे कौतुकास्पद आहे. विकासाचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी मी लोकप्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे. पुढील काळात ही सर्व समाज घटकांना सोबत घेऊन सातत्यपूर्ण कार्य करून लोकांचे प्रश्न सोडविण्यास माझे प्राधान्य राहील. महाराष्ट्र, बीड जिल्हा व केज विधानसभा मतदारसंघात दिवंगत नेत्या मंत्री डॉ.विमलताई मुंदडा यांनी खूप चांगले व भरीव कार्य केले आहे. जिल्ह्यातील सामाजिक स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन सामुहिक प्रयत्न केले पाहिजेत असा सकारात्मक विचार आमदार सौ.मुंदडा यांनी व्यक्त केला. यावेळी डॉ.नागोराव पवार यांनीही समायोचित मार्गदर्शन केले. तर दत्ताभाऊ बारगजे, सय्यद रहेमान चाॅंद पाशा, डॉ.संजय पवार, विनोद रापतवार, महावीर मस्के पाटील, प्रतिभाताई वानखडे, शिवाजीराव खोगरे, पांडुरंग आवाड आणि रेवणसिध्द लामतुरे या पुरस्कार प्राप्त मान्यवरांनी समर्पक व नेमक्या शब्दांत सत्काराला उत्तर दिले. सुरूवातीला ११ मान्यवरांना ‘कर्मयोगी डॉ.बालासाहेब ठोंबरे-पाटील स्मृती पुरस्कार’ तर अन्य ४ जणांना अनुक्रमे ‘स्व.माणिकराव दादासाहेब ठोंबरे-पाटील व स्व.सौ.राणीलक्ष्मीबाई दादासाहेब ठोंबरे-पाटील’ यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पुरस्कार प्रदान करण्यात आले. पुरस्कार प्राप्त मान्यवरांत अनिकेत द्वारकादास लोहिया, अबाजोगाई (सामाजिक सेवा पुरस्कार-२०२४), दत्ताभाऊ शंकरराव बारगजे, बीड (सामाजिक सेवा पुरस्कार-२०२५), सय्यद रहेमान चाॅंद पाशा, लातूर (भक्त पुंडलिक पुरस्कार-२०२४), डॉ.संजय शिवराम पवार, ता.कंधार, जि.नांदेड (भक्त पुंडलिक पुरस्कार-२०२५), विनोद नरहरराव रापतवार, नागपूर (आदर्श बंधू भरत पुरस्कार-२०२४), महावीर साहेबराव मस्के पाटील, ता.वडवणी जि.बीड (आदर्श बंधू भरत पुरस्कार-२०२५), डॉ.विनोद विजयकुमार चव्हाण, ता.जि.लातूर (पत्रकारिता पुरस्कार-२०२४), प्रा.नानासाहेब निवृत्तीराव गाठाळ (पत्रकारिता पुरस्कार-२०२५), अजीज खुद्दूस सय्यद, ता.जि.लातूर (सद्भावना पुरस्कार-२०२४), सौ.प्रतिभाताई जयंतराव वानखडे, ता.जि.अमरावती (सद्भावना पुरस्कार-२०२५), डॉ.रामधन अंबादास ठोंबरे (उंदरी ग्रामभूषण पुरस्कार-२०२५) तसेच स्व.माणिकराव दादासाहेब ठोंबरे-पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पांडुरंग साहेबराव आवाड, ता.कळंब,जि.धाराशिव (कुशल कारभारी किसान पुरस्कार-२०२४) आणि रेवणसिध्द भागवत लामतुरे, ता.जि.धाराशिव (कुशल कारभारी किसान पुरस्कार-२०२५) स्व.सौ.राणीलक्ष्मीबाई दादासाहेब ठोंबरे-पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सौ.शोभा शिवाजी खोगरे, अंबाजोगाई (कुशल कारभारीन किसान पुरस्कार-२०२४) आणि सौ.द्वारका प्रतापराव काळे, ता.पुर्णा,जि.परभणी (कुशल कारभारीन किसान पुरस्कार-२०२५) यांचा समावेश होता. पुरस्काराचे स्वरूप स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, पुष्पहार, फेटा, श्रीफळ असे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.दिगंबर मोरे यांनी केले. तर ज्येष्ठ विचारवंत डॉ.सोमनाथ रोडे यांना प्रदान करण्यात आलेल्या सन्मानपत्राचे वाचन करून उपस्थितांचे आभार सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ.बाबासाहेब ठोंबरे यांनी मानले. शेतकरी मेळावा व पुरस्कार वितरण समारंभाची सांगता राष्ट्रगीताने झाली. तत्पूर्वी पूर्वसंध्येला रविवार, दिनांक २५ मे रोजी सायंकाळी ‘खरीप पिक परिसंवाद व आत्मभान जागृती कार्यक्रम’ आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते ऍड.राजेसाहेब देशमुख (माजी अध्यक्ष, अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना, अंबाजोगाई.) आणि उद्घाटक म्हणून अविनाश पाठक (भाप्रसे) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य मत्स्य व्यवसाय विकास महामंडळ, मुंबई हे होते. यावेळी मार्गदर्शक म्हणून प्राचार्य डॉ.सोमनाथ रोडे (ख्यातनाम गांधीवादी विचारवंत तथा इतिहास अभ्यासक, लातूर.) आणि प्रा.अरूण गुट्टे (विस्तार कृषि विद्यावेत्ता, अंबाजोगाई.) यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. २५ व २६ मे या दोन्ही दिवशी कर्मयोगी डॉ.बालासाहेब ठोंबरे पाटील स्मृती प्रतिष्ठाणच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांसाठी उंदरी गावच्या सरपंच अश्विनीताई ठोंबरे पाटील, पंडित उध्दवराव आपेगावकर, माजी कुलगुरू मधुकरराव गायकवाड, माणिकराव बावणे, संपादक अभिजीत गाठाळ, पत्रकार रामदास साबळे, पत्रकार संतोष सोनवणे, पत्रकार व कवी प्रा.हनुमंत सौदागर, ज्येष्ठ साहित्यिक विश्वांभर वराट गुरूजी, सुप्रसिद्ध गझलकार प्रा.डॉ.मुकूंद राजपंखे, सुप्रसिद्ध कवी राजेश रेवले, राजेंद्र रापतवार, पत्रकार रणजित डांगे, सामाजिक कार्यकर्ते शाम सरवदे यांच्यासह महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या विविध क्षेत्रातील मान्यवरांसह पंचक्रोशीतील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. श्रीमती प्रभावती बालासाहेब ठोंबरे (पाटील) आणि जनार्धनराव दादासाहेब ठोंबरे (पाटील) यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अनंतराव ठोंबरे, सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ.बाबासाहेब ठोंबरे, सुदामराव ठोंबरे, बाळासाहेब सुर्यवंशी, उत्तरेश्वर सोनवणे, भरतराव ठोंबरे, लालासाहेब ठोंबरे, सौ.अनुराधा ठोंबरे-सुर्यवंशी, विनोद ठोंबरे, भारत कुरवडे, प्रमोद ठोंबरे यांचेसह उंदरी (ता.केज) येथील समस्त गांवकरी, माजी कृषी विद्यार्थी संघ, वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ, परभणी येथील मित्र परिवार, नातेवाईक आणि ठोंबरे कुटुंबियांनी पुढाकार घेतला होता.