अंबाजोगाई तालुक्यात शिक्षण संस्थेअंतर्गत होणारी प्रवेश प्रक्रिया गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्या अधिपत्याखाली पूर्ण करून डोनेशन घेणाऱ्या शाळेवर कारवाई करा
_अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन_

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
अंबाजोगाई तालुक्यात शिक्षण संस्थेअंतर्गत होणारी प्रवेश प्रक्रिया ही गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्या अधिपत्याखाली पूर्ण करून डोनेशन घेणाऱ्या शाळेवर तात्काळ कठोर कारवाई करा अशी मागणी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष राणा चव्हाण यांनी केली आहे. याबाबत अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे वतीने अंबाजोगाई येथील अप्पर जिल्हाधिकारी आणि गटशिक्षणाधिकारी यांना सोमवार, दिनांक १९ मे रोजी निवेदन देण्यात आले आहे.
अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर (बाबा) यांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनानुसार सोमवार रोजी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, अंबाजोगाई तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक व खाजगी शाळेतून प्रवेशासाठी बऱ्याच शाळेतून पैशांची मागणी केली जाते व पैसे आकारणी केल्याशिवाय विद्यार्थ्यांना त्या संबंधित शाळेतून प्रवेश दिला जात नाही. तसेच प्रवेशावेळी डोनेशन म्हणून घेतलेल्या त्या पैशांची अधिकृत पावती ही दिली जात नाही. यामुळे पालकांची मोठी कुचंबना होत आहे. शिवाय कामात दिरंगाई पण केली जाते. आपल्या आदेशानुसार प्रत्येक शाळेमध्ये नोटीस बोर्डावर ‘येथे डोनेशन घेतले जात नाही’ असे दर्शनी भागावर ठळकपणे नोटीस लिहिण्यात यावी अशी विनंती ही निवेदनातून केली आहे. वास्तविक प्राथमिक शिक्षण कायदा २००९ नुसार कोणत्याही शाळेला कुठली ही फीस आकारता येत नाही, तरी ही अनाधिकृत फी (डोनेशन) वसूल करण्याची पद्धत शासन नियमानूसार सर्व इंग्रजी आणि मराठी माध्यमांच्या शाळांमधून बंद करावी व अशा शाळांची सखोल चौकशी करण्यासाठी गटशिक्षण अधिकारी यांनी एक समिती निवडावी व विद्यार्थ्यांना योग्य तो न्याय द्यावा साहेबांनी या प्रकरणी लक्ष देऊन या समस्या सोडवाव्यात अशी सहकार्याची अपेक्षा अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. सदरील निवेदनाच्या प्रतिलिपी गटशिक्षण अधिकारी, गटशिक्षण कार्यालय अंबाजोगाई तसेच प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी यांना माहितीस्तव देण्यात आल्या आहेत. या निवेदनावर अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे बीड जिल्हाध्यक्ष राणा चव्हाण, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख रणजित डांगे, हिंदूलाल आबा काकडे, बा.ह.शेरेकर, माऊली वैद्य, प्रशांत आदनाक, नानासाहेब धुमाळ, ओमकार चव्हाण, धनंजय सुरवसे, नानासाहेब गायकवाड, विजयानंद सोळंके, लहुजी शिंदे, शेख अकबर, दयानंद गुजर, सचिन राऊत यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.