रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) पक्षाच्या मराठवाडा विभाग अध्यक्षपदी अक्षय भुंबे यांची निवड

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई (वार्ताहर)
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सचिन खरात) पक्षाच्या मराठवाडा विभाग अध्यक्षपदी अक्षय भुंबे यांची निवड करण्यात आली आहे. सदरील निवडीचे पत्र रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी भुंबे यांना मुंबई येथे दिले.
सोमवार, दिनांक १९ मे रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी मुंबई येथे पक्ष कार्यालयात मराठवाडा विभाग अध्यक्षपदी अक्षय भुंबे यांची निवड करून त्यांना नियुक्तीपत्र दिले. नियुक्तीपत्रात नमूद केले आहे की, अक्षय भुंबे हे आंबेडकरी चळवळीत अनेक वर्षे काम करीत असून त्यांनी दलित, शोषित, कामगार यांच्या प्रश्नांसाठी आंदोलने केली आहेत. त्यामुळे आंबेडकरी चळवळीचे काम करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) पक्षाच्या वतीने आपली नियुक्ती करण्यात आली आहे. तरीही ही नियुक्ती तीन वर्षांसाठी असेल तसेच पक्षविरोधी कारवाया आणि पक्षविरोधी भूमिका कोठेही तसेच सोशल मीडियात मांडल्यास पक्षाचा कायदेशीर या वैयत्तिक भूमिकेशी काहीही संबंध राहणार नाही याची नोंद घ्यावी असे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी नमूद केले आहे. पक्षाच्या ध्येयधोरणानुसार काम कराल अशी आशा बाळगून भुंबे यांच्या पुढील सामाजिक, राजकीय वाटचालीस मनःपुर्वक सदिच्छा व्यक्त केल्या आहेत. अक्षय भुंबे हे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे अभ्यासू व निष्ठावंत पाईक आहेत. सातत्यपूर्ण कार्य करणारे अक्षय भुंबे हे आंबेडकरी चळवळीचा मराठवाड्यातील एक आश्वासक चेहरा आहेत. मागील काही वर्षांपासून भुंबे यांचे सामाजिक बांधिलकीतून कार्य सुरू आहे. ते डिघोळ अंबा सेवा सहकारी संस्थेचे व्हाईस चेअरमन आहेत. आजपावेतो त्यांनी लोकलढा उभारून ३० भूमिहीन कुटुंबांना कसण्यासाठी जमीन मिळवून दिली. तसेच श्रमजिवी, मजूर व गरजूंना मोफत ई-श्रम कार्ड आणि कोविड लाॅकडाऊन काळात गरजू कुटुंबांना अन्नधान्याचे कीट वाटप केले. शेतकऱ्यांना तात्काळ सरसकट पिक विमा मंजुर व्हावा., एपीएल योजनेंतर्गत शासनाने स्वस्त धान्य वाटप व्हावे., डाटा एंट्री सुरू व्हावी., गावनिहाय पर्जन्यमापक यंत्र बसवावे., प्रत्येक गावात जनावरांसाठी चारा छावण्या उभा कराव्यात., शेतकऱ्यांना अखंड वीज देण्यात यावी., डिघोळअंबा हे गाव पाटोदा कृषि मंडळातून वगळून लोखंडी सावरगाव कृषि मंडळात समाविष्ट करावे या प्रमुख मागण्यांसाठी तसेच समाजात ज्यांना गरज आहे, त्यांच्या मदतीला सदैव धावून जात भुंबे यांनी यापूर्वी वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा महासचिव आणि ऑल इंडिया पॅंथर सेनेचे मराठवाडा युवक अध्यक्ष म्हणून ही त्यांनी सातत्यपूर्ण आंदोलन केले आहे. त्यांच्या याच समाजाभिमुख कार्याची नोंद घेवून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी भुंबे यांची मराठवाडा विभाग अध्यक्षपदी निवड केली आहे. आपल्या निवडीनंतर आमच्या प्रतिनिधीशी बोलताना अक्षय भुंबे यांनी सांगितले की, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्यासह बीड जिल्ह्यात सर्वांना सोबत घेऊन पक्ष संघटनेला अधिक बळकट करण्याचे काम करण्यात येईल. निवडीबद्दल भुंबे यांनी नेतृत्वाचे आभार मानले आहेत. अक्षय भुंबे यांच्या निवडीचे सर्वस्तरांतून स्वागत करण्यात येत आहे.