शालांत परीक्षेत श्री राजर्षी शाहू विद्यालय, तळेगाव (घाट) शाळेचे घवघवीत यश
शाळेने उज्ज्वल निकालाची परंपरा कायम ठेवली

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
तालुक्यातील तळेगाव (घाट) येथील अभिनव शिक्षण संस्था, अंबाजोगाई संचालित श्री राजर्षी शाहू विद्यालय या शाळेने मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या शालांत प्रमाणपत्र (एसएससी) परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केले. या वर्षी शाळेचा निकाल ९२.८५ टक्के एवढा लागला आहे. शाळेच्या अनेक विद्यार्थ्यांनी ८० टक्क्यांहून अधिक गुण मिळवत संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. बर्दापूर केंद्रातून व शाळेतून अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावणाऱ्यांसह सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे सर्वस्तरांतून कौतुक होत आहे.
अभिनव शिक्षण संस्था, अंबाजोगाई संचालित श्री राजर्षी शाहू विद्यालय या शाळेच्या गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या सातत्यपूर्ण अभ्यास, चिकाटी आणि शिस्तीच्या बळावर हे यश मिळविले आहे. शाळेचे विशेष प्रविण्यात १२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. प्रथम श्रेणीत ८ विद्यार्थी तर द्वितीय श्रेणीत ६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. शाळेच्या वेदश्री मुकुंद सिरसाट हिने (९७.४०) टक्के गुण घेऊन बर्दापूर केंद्रातून व शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे. तर कु.रेणुका कोंडीराम वाघमारे हिने (९०.८०) टक्के गुण घेऊन द्वितीय येण्याचा आणि श्रीनिवास संतोष कांबळे या विद्यार्थ्याने (८८.८०) टक्के गुण घेऊन तृतीय येण्याचा मान पटकावला आहे हे विशेष होय. शाळेने शैक्षणिक क्षेत्रात प्राप्त केलेल्या या उज्ज्वल यशाबद्दल संस्थेचे सचिव शिवाजीराव चन्नागिरे, सर्व संस्था संचालक मंडळ, बीड जि.प.चे माजी सदस्य संजय गिराम, तळेगाव (घाट) व वालेवाडी गावचे सरपंच, सेवा सहकारी सोसायटी चेअरमन, ग्रामस्थ, पालक, शाळेचे माजी विद्यार्थी, युवक यांनी शाळेचे मुख्याध्यापक, विद्यार्थ्यांचे पालकांचे, शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे विशेष अभिनंदन केले. संस्थेचे सचिव शिवाजीराव चन्नागिरे व शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत सोमवंशी यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे विशेष अभिनंदन करीत सांगितले की, ‘हे यश म्हणजे संपूर्ण शिक्षकवृंद, पालक आणि विद्यार्थ्यांच्या परिश्रमाचे फलित आहे. आमची शाळा गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी कटीबद्ध आहे आणि हे यश त्याचाच पुरावा आहे.’ असे दोन्ही मान्यवरांनी सांगितले. तर या यशाबद्दल पालकवर्ग आणि ग्रामस्थांनीही विद्यार्थ्यांचे व शाळेचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. श्री राजर्षी शाहू विद्यालय ही शाळा भविष्यात ही अशाच प्रकारे विद्यार्थ्यांना घडवित राहील असा विश्वास यावेळी सर्वांनी व्यक्त केला.