अंबाजोगाई जिल्हा निर्मितीची घोषणा करून विकासकामांना मंजुरी द्यावी
समाजवादी पार्टीकडून मुख्यमंत्र्यांना मागण्यांचे निवेदन

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
अंबाजोगाई जिल्हा निर्मितीची घोषणा करून विविध विकासकामांना मंजुरी द्यावी अशा मागण्या समाजवादी पार्टीच्या वतीने राज्याच्या मुख्यमंत्र्यांना उपजिल्हाधिकारी, अंबाजोगाई यांच्या मार्फत मंगळवार, दिनांक ३१ डिसेंबर रोजी दिलेल्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.
समाजवादी पार्टीच्या वतीने प्रदेश सचिव तथा बीड जिल्हा प्रभारी ऍड.शिवाजी कांबळे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सालेहा जिलानी शेख, अंबाजोगाई तालुकाध्यक्ष जिलानी शेख, शहराध्यक्ष राजेश मातादीन परदेशी, शेख शौकत यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना उपजिल्हाधिकारी, अंबाजोगाई यांच्या मार्फत मंगळवार, दिनांक ३१ डिसेंबर रोजी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, अंबाजोगाई जिल्हा निर्मीतीचा प्रश्न हा मागील ३५ वर्षांपासुन प्रलंबीत आहे व त्याच बरोबर १) आशिया खंडातील सर्वांत मोठे स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय ग्रामीण रूग्णालय हे अंबाजोगाई येथे असून या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणुक करणे, साधन सामुग्रीचा अभाव असून त्यासाठी निधी उपलब्ध करून देणे, २) नवीन बुट्टेनाथ साठवण तलावाची निर्मीती करणे, ३) काळवटी साठवण तलावाची उंची वाढविणे, ४) नवीन एम.आय.डी.सी उभा करून रोजगार निर्मीती करणे, ५) शैक्षणिक दृष्टीकोनातून अंबाजोगाई येथे शैक्षणिक हब उभा करणे, ६) शेतकऱ्यांच्या शेती मालाला हमीभाव घोषीत करावा, ७) नवीन घाटनांदुर ते अंबाजोगाई रेल्वे मार्ग निर्माण करण्यात यावा, ८) अंबाजोगाई मध्ये विमानतळाची निर्मीती करण्यात यावी, ९) बुट्टेनाथ भागात दुध संकलन केंद्र उभा करण्यात यावे, १०) बुट्टेनाथ भागात पर्यटनासाठी उद्यान निर्मीती करणे, ११) डॉ.बाबासाहेब अंबेडकर विद्यापीठाचे उपकेंद्राची इमारत उभा करून केंद्र सुरू करण्यात यावे, १२) अंबाजोगाई शहरात नगरपरीषदेच्या सांस्कृतिक सभागृहाची निर्मीती करणे, १३) बचतगटाचे माध्यमातून तयार केलेल्या मालाला भाव मिळवून देणे, १४) जिल्हा परीषद शाळांचे पुनर्वसन करून चांगल्या दर्जाचे शिक्षण देणे आणि १५) साखर कारखाने सतत बंद असतात. ते सुरू करणे व शेतकऱ्यांच्या ऊसाला चांगला भाव मिळवून देणे आवश्यक आहे. या सर्व मागण्या मा.मुख्यमंत्री साहेबांनी मंजुर कराव्यात अन्यथा समाजवादी पक्षाचे वतीने आंदोलन करण्यात येईल. असा इशारा ही या निवेदनातून देण्यात आला आहे. सदरील निवेदनावर ऍड.शिवाजी कांबळे, सालेहा जिलानी शेख, जिलानी शेख, राजेश मातादीन परदेशी, शेख शौकत, ऍड.डी.एल.केंद्रे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.