सोयाबीन खरेदीला एक महिन्यापर्यंत मुदतवाढ द्यावी – राजेसाहेब देशमुख
दर घसरल्याने शेतकऱ्यांत नाराजी ; सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची फरपट थांबवा

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
सोयाबीन खरेदीसाठी आणखी काही दिवस मुदतवाढ मिळणे आवश्यक आहे. कारण, अद्याप ही ५० टक्क्यांहून अधिक सोयाबीन शेतकऱ्यांकडे शिल्लक आहे. खाजगी व्यापाऱ्यांकडे भाव नाही व शासकीय खरेदी केंद्राकडे अनेक ठिकाणी बारदाना नाही. यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन खरेदी केंद्रांवर आणले नव्हते. तशातच मुदतवाढ संपणार असल्याने मागील दहा ते पंधरा दिवसांपासून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी आपले सोयाबीन किरायांच्या वाहनातून खरेदी केंद्रांवर आणले आहे. सोयाबीनने भरलेल्या वाहनांच्या रांगा खरेदी केंद्रांसमोर दिसून येत आहेत. सोयाबीनचे दर घसरल्याने शेतकरी वर्गात नाराजी आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची फरपट थांबवा. आणि सोयाबीन खरेदीला एक महिन्यापर्यंत मुदतवाढ द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते राजेसाहेब देशमुख यांनी केंद्र व राज्य सरकारकडे केली आहे.
गुरूवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते राजेसाहेब देशमुख यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की, केंद्रीय कृषिमंत्र्यांनी सोयाबीन खरेदीला ६ फेब्रुवारी २०२५ पर्यंत मुदतवाढ दिली होती. त्याची मुदत आज संपली. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. सोयाबीन खरेदीची मुदत गुरूवारी संपणार असल्याने खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांची एकच गर्दी उसळली आहे व खरेदी केंद्राबाहेर मागील दहा ते पंधरा दिवसांपासून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. त्यामुळे आता केंद्र सरकारने सोयाबीन खरेदीची मुदत वाढवावी. अन्यथा खाजगी व्यापाऱ्यांना कवडीमोल भावाने आपले सोयाबीन विकावे लागेल. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी आपले सोयाबीन किरायांच्या वाहनातून खरेदी केंद्रांवर आणले आहे. सोयाबीनने भरलेल्या वाहनांच्या रांगा खरेदी केंद्रांसमोर दिसून येत आहेत. एका दिवसाचे भाडे अंदाजे एक हजार रूपये आहे. खाजगी व शासकीय खरेदीच्या भावात एक हजार रूपयांहून अधिकची तफावत आहे. मागील ३ वर्षांचा विचार करता, सोयाबीनच्या दरात ३१ टक्क्यांनी घसरण झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान होत आहे. तशातच एका शेतकऱ्याच्या नांवावर फक्त २५ क्विंटल एवढेच सोयाबीन खरेदी केले जात आहे. ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीनचे अधिक उत्पादन घेतले. त्या शेतकऱ्यांना या जाचक नियमामुळे सोयाबीन विक्री करताना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही परिस्थिती बीड जिल्ह्यात सर्वत्र दिसून येत आहे. त्यामुळे जिल्ह्यासह राज्यात सोयाबीनची खरेदी वेगाने सुरू असून ६ फेब्रुवारी नंतर ही सोयाबीनची खरेदी पुढे एक महिना तरी अशीच सुरू रहावी, खरेदी केंद्रांचा विलंब आणि शासकीय धोरण यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना किरायाने आणलेल्या वाहनाचे भाडे नुकसान भरपाई म्हणून देण्यात यावे अशी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची मागणी आहे. त्या अनुषंगाने सोयाबीन खरेदीसाठी आणखी पुढील काही दिवस मुदतवाढ मिळावी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची फरपट थांबवा. आणि सोयाबीन खरेदीला एक महिन्यापर्यंत मुदतवाढ द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते राजेसाहेब देशमुख यांनी केंद्र व राज्य सरकारकडे केली आहे. यासाठी महाराष्ट्र सरकारचे पणन मंत्री ना.जयकुमार रावल यांनी केंद्रीय कृषिमंत्र्यांकडे नव्याने मुदतवाढीचा प्रस्ताव पाठवावा अशी अपेक्षाही देशमुख यांनी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने केली आहे.