एक लाख इंग्रजी वाक्य लिहीणाऱ्या कु.श्रेया पूनम ढोलेचे कौतुक
भीमजयंती महोत्सवात 'आई सेंटर प्रो' तर्फे गुणवंतांचा गुणगौरव

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज डिजिटल मिडिया
सामाजिक, शैक्षणिक विशेष
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
संघर्षभूमीवर १ एप्रिल पासून १४ दिवसीय भीमजयंती महोत्सव सुरू आहे. या महोत्सवात आई सेंटरचे प्रो चे संचालक प्रा.सर नागेश जोंधळे यांचे ‘ज्ञानाचे प्रतीक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असलेला तरूण, समाज व देश’ या विषयावर उपस्थितांमध्ये चैतन्य निर्माण करणारे व्याख्यान संपन्न झाले. याप्रसंगी आई सेंटर प्रो च्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंतांचा विशेष सत्कार करण्यात आला.
सर्व सत्कारार्थींचा गुलाब पुष्पगुच्छ व भारतीय संविधानाची प्रत व देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रा.राहुल सुरवसे, ऍड.दिलीप गोरे, राणी जोगदंड, रूपेश जोगदंड व प्रा.सुनिल वाघमारे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच विश्वविक्रमवीर लेखक तथा प्रेरणादायी वक्ते सर नागेश जोंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली केवळ दोन महिन्यांतच इंग्रजीतील दैनंदिन जीवनात वापरात येणाऱ्या एक लाख वाक्य लिहिण्याचा व बोलण्याचा विक्रम करणाऱ्या इयत्ता अकरावीतील श्रेया पूनम ढोले यांचाही संविधान ग्रंथ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच यूपीएससीची परीक्षा देऊन जिल्हाधिकारी बनण्यासाठीचे स्वप्न बाळगणाऱ्या मान्यवरांनी व उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात शुभेच्छा दिल्या. यावेळी ऍड.शाम तांगडे, भारत सातपुते, डॉ.इंद्रजीत भगत, डॉ.मकरंद जोगदंड, सचिन आंबाड, डॉ.किर्तीराज लोणारे व सविता लोणारे यांच्या हस्ते या गुणवंतांचा गौरव करण्यात आला. या गुणगौरव कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.नागेश जोंधळे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार सुभाष घाडगे यांनी मानले.
*ध्येय प्राप्तीसाठी जिद्द, चिकाटी व सातत्य आवश्यक :*
आपणांस डॉक्टर व्हायचे असो वा, इंजिनीअर, क्लास वन वा, सुपर क्लास वन अधिकारी, व्यावसायिक वा उद्योजक आपण पाहिलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठी व ध्येयप्राप्तीसाठी जिद्द, चिकाटी, सातत्य व आपणांस योग्य दिशा आवश्यक असते. यासोबतच ती दिशा दाखवणारा गुरू व आपल्याकडून त्यांनी दाखविलेल्या मार्गावर चालण्यासाठीची मानसिकता ठेवल्यास आपणास उत्तुंग असे यश प्राप्त करता येते. कु.श्रेया पूनम ढोले यांनी इंग्रजीतील एक लाख वाक्य लिहिण्याचा जाणीवपूर्वक सराव करीत असताना घेतलेला पुढाकार (इनिशिएटिव्ह), जिद्द व सातत्य हे खूप वाखण्याजोगे आहे. अकरावीतील श्रेया ही करू शकते तर आपणही हे नक्कीच करू शकता.
*- सर नागेश जोंधळे*
(विश्वविक्रमवीर लेखक तथा आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते, संस्थापक, आई सेंटर प्रो.)
*जिल्हाधिकारी होण्यासाठीच्या स्वप्नांना आई सेंटर देतेय बळ :*
मागील सहा महिन्यांपासून आई सेंटर प्रो कॅम्पस मध्ये सर नागेश जोंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली इंग्रजी भाषेची तयारी करत असतानाच स्टेज करेज व प्रभावी भाषणाच्या क्षमतेसाठी नांवलौकिक असलेले अंबाजोगाईतील आई सेंटर प्रो येथे अधिकाधिक सराव करताना स्वतःतील सुप्त गुणांचा विकास करण्यासाठी विविध कोर्सेसचे प्रशिक्षण घेत आहे. सर्वप्रथम सरांनी आपणांस एखादी गोष्ट का ? करायची आहे व ती पूर्ण करण्यासाठीची ब्ल्यू प्रिंट (गोल सेटिंग ऍंड अचिव्हमेंट) प्रात्यक्षिकपणे सांगितले. आई सेंटरच्या माध्यमातून एक लाख इंग्रजीतील वाक्य लिहिण्याचा विक्रम ही केवळ सुरूवात आहे. आणखी जोंधळे सर यांच्या प्रभावी प्रशिक्षणातून आवश्यक ती मानसिकता व विविध कौशल्यांचा विकास करून तरूण व कर्तुत्ववान जिल्हाधिकारी होण्याचे स्वतःचे व आईचे स्वप्न पूर्ण करून चांगली देशसेवा करण्याचा ध्यास आहे.
*- कु.श्रेया पूनम ढोले*
(वर्ग ११ वी, खोलेश्वर महाविद्यालय अंबाजोगाई व प्रशिक्षणार्थी, आई सेंटर प्रो कॅम्पस.)