राज्यस्तरीय महात्मा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर ग्रंथ पुरस्कार उपप्राचार्य प्रा.गौतम गायकवाड यांच्या ग्रंथास जाहीर
२२ जुन रोजी पुणे येथे मान्यवरांच्या हस्ते वितरण

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
येथील प्रवर्तनवादी चळवळीतील आघाडीचे लेखक उपप्राचार्य प्रा.गौतम गायकवाड यांच्या ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि आंबेडकरी साहित्य (आकलन आणि अवलोकन)’ या ग्रंथास सन २०२३-२०२४ या सालासाठी दिला जाणारा राज्यस्तरीय ‘महात्मा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर ग्रंथ’ प्रथम पुरस्कार जाहीर झाला आहे. या बाबतचे पत्र त्यांना नुकतेच प्राप्त झाले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल उपप्राचार्य प्रा.गायकवाड यांचे सर्वस्तरांतून अभिनंदन होत आहे.
यापूर्वी प्रा.गायकवाड यांच्या ‘व्हि.जे.आरक’ या ग्रंथास राज्यस्तरीय तृतीय, ‘प्रज्ञासुर्याचे सुर्यपुत्र’ या ग्रंथास राज्यस्तरीय प्रथम, ‘बुध्द प्रबुद्ध विचारांच्या पाऊलखुणा’ या ग्रंथास सन-२०२५ साठी दिला जाणारा राज्यस्तरीय ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकॅडमी’ तृतीय पुरस्कार आणि ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि आंबेडकरी साहित्य (आकलन आणि अवलोकन)’ या ग्रंथास सन-२०२२ साठी दिला जाणारा राज्यस्तरीय ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकॅडमी’ द्वितीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. एकाच संस्थेचे सलग चार पुरस्कार उपप्राचार्य प्रा.गौतम गायकवाड यांना मिळाले आहेत. ही विशेष उल्लेखनीय बाब आहे. उपप्राचार्य प्रा.गायकवाड हे आंबेडकरी चळवळीतील आघाडीचे लेखक, कवी आणि विचारवंत आहेत. त्यांच्या समग्र व उल्लेखनीय कारकिर्दीची दखल घेत महात्मा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर ग्रंथ पुरस्कार आणि विचार प्रसारक संस्था, पुणे यांचे अध्यक्ष ऍड.एल.टी.सावंत, जनरल सेक्रेटरी प्रा.आर.आर.सोनकांबळे आणि ग्रंथ पुरस्कार निवड समितीचे चेअरमन डॉ.दिपक गायकवाड यांनी या बाबत नुकतेच कळविले आहे. त्यानुसार या पुरस्काराचे वितरण रविवार, दिनांक २२ जुन २०२५ रोजी सायंकाळी ५ ते ८ या वेळेत इतिहास संशोधन मंडळ, भरत नाट्य मंदिराशेजारी, सदाशिव पेठ, पुणे येथे प्रमुख अतिथी दयानंद माने (निवासी संपादक, दैनिक सकाळ वृत्तपत्र मिडिया, पुणे) यांच्या हस्ते व माजी आमदार ऍड.एल.टी.सावंत यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित एका विशेष समारंभात करण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून डॉ.प्रकाश पवार (उपप्राचार्य, फर्ग्युसन कॉलेज, पुणे) हे असणार आहेत. या समारंभात उपप्राचार्य प्रा.गौतम केरबा गायकवाड (प्रथम क्रमांक), जयराम सदाशिव खुने (द्वितीय क्रमांक) आणि बाबुराव नामदेव धांडोरे (तृतीय क्रमांक) या लेखकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. मागील ३५ वर्षांपासून महात्मा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर ग्रंथ पुरस्कार आणि विचार प्रसारक संस्था, पुणे या संस्थेच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच भारतीय लोककल्याण कार्य आणि चळवळीबद्दल संस्था कार्यरत राहून पुरोगामी विचार प्रसार व प्रसारासाठी संस्था कार्यरत आहे. मागील अनेक वर्षांपासून म.फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करणाऱ्या लेखकांकडून दिलेल्या पत्त्यावर ग्रंथ मागवून अभ्यासू व्यक्तिंकडून त्याचे परीक्षण करून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक काढून पुरस्कार जाहीर व प्रदान केला जातो. अशा उत्कृष्ट लेखकांना मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. सन २०२३-२४ या सालासाठीचे प्रथम पुरस्कार प्राप्त प्रा.गौतम गायकवाड यांना यापुर्वीही डॉ.जगजीवनराम लेखक पुरस्कार (नेपाळ), प्रेरणा समीक्षा पुरस्कार (पुणे), समाजभुषण पुरस्कार (सोलापुर), उत्कृष्ट लेखक पुरस्कार (लातूर) आणि व्ही.जे.आरक या ग्रंथास राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. उपप्राचार्य प्रा.गायकवाड यांचे २२ हून अधिक पुस्तके, विविध वृत्तपत्र, नियतकालिकांतून नियमित प्रासंगिक लेखन, दहा पेक्षा अधिक ग्रंथांचे संपादन, त्यांनी केले आहे. या सोबतच सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि धार्मिक कार्यात त्यांचा सक्रीय सहभाग राहिला आहे. अनेक चर्चासत्रात सहभाग घेत विविध नियतकालिकांतून त्यांचे सव्वा तिनशेहून अधिक लेख प्रकाशित झाले आहेत. नवोदित साहित्यिक, कवी यांना प्रोत्साहन देण्याचे तसेच त्यांच्या ग्रंथ प्रकाशनासाठी प्रसंगी सर्वोतोपरी भरीव सहकार्य करण्याचे कार्य देखिल प्रा.गायकवाड यांनी वेळोवेळी केले आहे. व्ही.जे.आरक सेवाभावी संस्था आणि परिवर्तन साहित्य मंडळाचे ते अध्यक्ष ही आहेत. तसेच ‘परिवर्तन संशोधन’ मासिकाचे कार्यकारी संपादक आहेत. परिवर्तन साहित्य संमेलनाच्या आयोजनात त्यांचा पुढाकार आहे. आगामी काळात ११ विविध विषयांशी संबंधीत ग्रंथ, काव्य संग्रह, प्रवर्तनवादी चळवळीला बळ देणाऱ्या ग्रंथाचे लेखक म्हणून ही ते ओळखले जातात. या सर्व विषयांवरील त्यांच्या विविध ग्रंथसंपदा या प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. उपप्राचार्य प्रा.गौतम केरबा गायकवाड हे सध्या अंबाजोगाईतील खोलेश्वर महाविद्यालयाचे उपप्राचार्य आणि मराठी भाषा विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. मागील ३३ वर्षांपासून ते अध्यापनाचे कार्य करीत आहेत. त्यांनी नाटक, कथा, कविता, प्रासंगिक, संशोधन, संपादन, आंबेडकरी चळवळ संदर्भाने विपुल ग्रंथ व साहित्य संपदा निर्मिली आहे. त्यांना आता ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि आंबेडकरी साहित्य (आकलन आणि अवलोकन)’ या ग्रंथास सन २०२३-२०२४ या सालासाठी दिला जाणारा राज्यस्तरीय ‘महात्मा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर ग्रंथ’ प्रथम पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याबद्दल उपप्राचार्य प्रा.गौतम गायकवाड यांचे सामाजाच्या सर्वस्तरांतून अभिनंदन होत आहे.