जवळबन येथे स्मार्ट प्रकल्पांतर्गत सोयाबीन शेतीशाळा संपन्न

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज विशेष
कृषी वैभव
माळेगाव/प्रतिनिधी:केज तालुक्यात मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे सोयाबीन, कापूस पिक उगवून आले आहेत.या पिकांचे कीड रोग अन्नद्रव्य व्यवस्थापन करण्याच्या अनुषंगाने उपविभागीय कृषी अधिकारी सूर्यकांत वडखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील जळबन येथे सोमवारी (दि१७ जुलै) शेतीशाळा संपन्न झाली. उपविभागीय तंत्रज्ञान समन्वयक शिवप्रसाद येळकर यांनी सोयाबीनवरील चक्रीभुंगा, खोडमाशी, पिवळा मोझॅक विषाणू प्रादुर्भाव, अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे पिवळी झालेली पाने यांची निरीक्षणे हस्तपत्रकांच्या सहाय्याने दाखवून व्यवस्थापनाचे उपाय सुचवले त्याचप्रमाणे ऊस पिकामधील चाबुक कानी रोग आणि कापूस पिकामधील आकस्मिक मर व्यवस्थापनाची माहिती दिली. तालुका कृषी अधिकारी सागर पठाडे यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेची केवायसी करण्यासंदर्भात विस्तृतपणे मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे उपस्थित शेतकऱ्यांसोबत संवाद साधून शेतकऱ्यांच्या अडचणी समजावून घेतल्या. यावेळी मंडळ कृषी अधिकारी नागेश येवले, कृषी पर्यवेक्षक राजेंद्र मदने, आत्माचे सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक आनंद मुंडे, कृषी सहाय्यक राहुल मुळे, राशिद शेख, माचवे तसेच मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
असे करा सोयाबीनवरील कीड-रोग अन्नद्रव्य व्यवस्थापन.
पावसाचा खंड पडल्यामुळे झाडे सुकत असतील तर याच्या व्यवस्थापनासाठी पोटॅशियम नायट्रेट (१३: ००: ४५) किंवा १३:४०:१३ या विद्राव्य खताची ८ ग्रॅम प्रति १ लिटर पाण्यातून फवारणी करावी.
सुक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे पीक पिवळे पडल्यास सुक्ष्म अन्नद्रव्य महाराष्ट्र ग्रेड-२ ची ५० मि.ली. प्रति १० लिटर पाण्यातून फवारावे.
रसशोषक किडींच्या व्यवस्थापनासाठी एकरी ६० पिवळे चिकट सापळे लावावेत.
पिवळा मोझॅक विषाणू रोगग्रस्त झाडे शेतातून काढून जाळून टाकावीत.
मावा, पांढरी माशी, तुडतुडे, खोडमाशी, चक्रीभुंगा, अळीवर्गीय किडींच्या व्यवस्थापनासाठी क्लोरँट्रानिलीप्रोल ९.३% अधिक लँबडा सायहॅलोथ्रीन ४.६% झेडसी (५ मिली) प्रति १० लिटर पाण्यातून फवारावे.
जवळबन येथे स्मार्ट प्रकल्पांतर्गत सोयाबीन शेतीशाळा संपन्न.
बातमी संकलन- बळीराम लोकरे माळेगांव